सिगन चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सिगन चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसकेई अकादमी संघाने रुषी अकादमीचा 65 धावांनी तर एन डी वारियर्स संघाने शहापूर अकादमी संघाचा 8 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. शिवराज तांडेल, कैफ मुल्ला यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या सामन्यात एसकेई अकादमी संघाने 20 षटकात 8 बाद 144 धावा केल्या. शिवराज तांडलेने 3 षटकार 9 चौकारासह 89, आदित्य वाघमारेने 12 धावा केल्या. रुषी अकादमीतर्फे दत्ता सनदीने 25 धावात 4, प्रदीपने 24 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रुषी अकादमीचा डाव 16 षटकात सर्व बाद 79 धावात आटोपला. महांतेश व विश्वजीत यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रसादने 18 धावात 3, राघवेंद्र व मनिष यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात शहापूर संघाने 20 षटकात 8 बाद 116 धावा केल्या. अक्षयने 2 षटकार 4 चौकारासह 42, हर्ष बोकडे व दत्ता पाटील यानी प्रत्येकी 21 धावा केल्या. एन डी वॉरियर्सतर्फे कैफ मुल्लाने 30 धावात 3, मोहिद सय्यदने 18 धावांत 2, किरणने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एन. डी. वॉरियर्स संघाने 14.5 षटकात 2 बाद 118 धावा करुन सामना 8 गडय़ांनी जिंकला. रेहान अलीने 42, कामिल 31 धावा केल्या. शहापूरतर्पे हरिष व अबीब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर शिवराज व कैफ मुल्ला यांना तर इम्पॅक्ट खेळाडू दत्ता सनदी, अक्षय यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









