लडाखमध्ये जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळले ः 19 जखमींना केले एअरलिफ्ट
लेह / वृत्तसंस्था
लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात लष्कराचे 7 जवान हुतात्मा झाले. तसेच अन्य 19 जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्व जवानांना हवाई दलाच्या मदतीने काही तासांनंतर हरियाणाच्या पंचकुला जिह्यातील चंडीमंदिरमध्ये हलवण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. थोईसेपासून सुमारे 25 कि.मी. अंतरावर असलेल्या एका अवघड वळणावर ही दुर्घटना घडल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून देण्यात आली. तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्यापासून सुमारे 50 ते 60 फूट खोलवर नदीपात्रात कोसळल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळल्याने शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 7 जवानांना प्राण गमवावे लागले. भारतीय लष्कराच्या निवेदनानुसार, 26 सैनिकांची तुकडी परतापूरहून हनीफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे जात होती. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाहन घसरून श्योक नदीत कोसळले. जखमी जवानांना तेथून आर्मी फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जवानांवरील उपचारासाठी लेहहून परतापूरला लष्कराच्या सर्जिकल टीम्स पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हरियाणातील पंचकुलामध्ये 19 जखमींवर उपचार
अपघातात इतरांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. 26 सैनिकांचे पथक परतापूर येथील संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफकडे जात होते, असेही सदर अधिकाऱयाने सांगितले. सर्व जखमींना सुरुवातीला परतापूर येथील 403 फिल्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. काही तासांनंतर सर्व 19 जखमी जवानांना हरियाणातील पंचकुला जिह्यातील चंडीमंदिर येथे विशेष हवाई सेवेच्या माध्यमातून हलवण्यात आले.
संरक्षणमंत्री, पंतप्रधानांकडून आढावा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. काश्मीरमधील लष्करी अधिकाऱयांच्या संपर्कात राहून या घटनेचा आढावा त्यांनी घेतला. ही घटना हृदयद्रावक असून जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. तसेच या अपघातात मृत झालेल्या जवानांच्या कुटुंबियाप्रती दोघांनीही संवेदना व्यक्त केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही या घटनेबाबत शोकभावना नोंदवल्या आहेत.









