संभाजीराजे मुंबईत जाहीर करणार भूमिका : राज्यसभेच्या मोहिमेला शिवसेनेकडून धक्का : मराठा संघटनांसह राजे समर्थक आक्रमक
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अपक्ष लढण्याचा निर्धार केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या मोहिमेला धक्का बसला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दगा फटका केल्याचा आरोप करत मराठा संघटनांसह राजेसमर्थक आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते कोणत भूमिका घेतात, कुणाचा पोलखोल करतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेचे उमेदवारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचे सन्मान राखतील. अशी प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी दिली होती. मात्र शिवसेनेने कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. पवार यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती. त्यातून ठाकरे आणि पवार यांनी संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांना संदेश दिल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या विपरीत घडल्याने संभाजीराजे समर्थकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला, संभाजीराजेंबरोबर दगा फटका केला आहे, अशा शब्दात संभाजराजेंचे समर्थक सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांशी बोलताना भावना व्यक्त करत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर करत नाहीत, तोपर्यंत माझी प्रतिक्रिया देणार नाही. अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतले होती. मात्र गुरूवारी शिवसेनेने राज्यसभेचे सहावे उमेदवार म्हणून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावरून आता संभाजीराजे यांनी भूमिका घेण्याचे निश्चित केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आज गुरूवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील मराठी पत्रकार भवनात ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
संभाजीराजेंच्या ट्व्टिची राज्यभर चर्चा
महाराज…. तुमच्या नजरेतलं ‘स्वराज्य’ मला घडवायचं…. मी कटिबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी….. मी बांधील असेन तो फक्त जनतेशी……..असे ट्व्टि संभाजीराजे यांनी गुरूवारी सकाळी सोशल मीडियावर ट्व्टि केले. राज्यभर या ट्व्टिची चर्चा सुरू झाली. संभाजीराजेंची पुढील भूमिका काय असेल? याचा अंदाज त्यांच्या समर्थकांना आला. लाखो लाईक्स या ट्व्टिला मिळाल्या.
छत्रपती मावळे घडवितात : शहाजीराजेंचा राऊतांना टोला
शिवसेना नेते संजय राऊत मावळय़ांमुळे राजे आहेत, अशी टिप्पण्णी केली होती. संभाजीराजे यांचे सुपुत्र शहाजीराजे यांनी छत्रपती मावळे घडवितात. छत्रपती अािण मावळे यांच्या कुटुंबाचे नाते असते असे सांगत राऊत यांना टोला लगावला आहे.
अपक्ष की माघार?
राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढणार की, माघार घेणार ? याविषयी आजच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर ते गेल्या पंधरा वीस दिवसांत शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेबाबतही पोलखोल करण्याची शक्यता आहे.