ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि पक्षाचे कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) उपस्थित होते. शिवसेनेकडून राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. ३० मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असून, १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. यासाठी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. पण शिवसेनेने संभाजीराजे यांना हातात शिवबंधन बांधा अशी अट घातली. पण संभाजीराजे यांनी ही ऑफर नाकारत अपक्षच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. बुधवारी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यांनतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावावर शिक्केमोर्तब झाल्याचे सांगत, गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केली होती. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, मगच त्यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी देूऊ, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शिवबंधन बांधण्यास यावे, असा निरोपही संभाजीराजेंना पाठवला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करण्याची भूमिका घेतलेल्या संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भाजापानेही अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे छत्रपती निवडणुकीतून माघार घेणार अशीही चर्चा आहे.