पंचायत निवडणूक पावसाळ्यानंतरच : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निवेदन
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील ज्या 186 ग्राम पंचायतींचा कार्यकाळ 19 जून रोजी संपुष्टात येत आहे तेथे आता प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे. त्यामुळे राज्यात ग्राम पंचायत निवडणूक पुढील चार महिन्यांनंतरच होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.
पावसाळा उंबरठय़ावर पोहोचला असल्याने पुढील चार महिन्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सरकारचे मत बनले आहे. म्हणुनच विद्यमान पंचायतींचा ताबा प्रशासकाकडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
ओबीसी अहवालानंतरच निवडणूक
पणजीत एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची शिफारस केली होती. मात्र ती शिफारस सरकारला मान्य झाली नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सूचविलेल्या ट्रिपल टेस्टच्या निकषानुसार ओबीसी आयोगाने काम सुरु करावे आणि सदर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करावा व त्यानुसारच निवडणूक घेण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
न्यायालयाचा ‘ट्रिपल टेस्ट’ आदेश
आता सरकारने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक लांबणीवर टाकण्याची शिफारस केली आहे. राज्यातील 186 पंचायतींचा कार्यकाळ 19 जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नवीन पंचायत मंडळ सत्तेवर येणे आवश्यक होते. परंतु ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ट्रिपल टेस्ट निवाडय़ामुळे निवडणूक रखडली आहे.
पावसाळय़ात निवडणूक शक्य नाही
दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ संपुष्टात येणाऱया सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या कामासाठी बराच अवधी लागणार असून ऐन पावसाळ्यात निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी शिफारस निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इच्छुकांमध्ये पसरली नाराजी
दरम्यान, अशाप्रकारे निवडणूक रखडल्यामुळे राज्याच्या विविध भागातील इच्छुकांमध्ये मात्र निराशेचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांचा तूर्त भ्रमनिरस झाला आहे. अनेक पंचायतींमध्ये विद्यमान पंच जे ही निवडणूक लढविणार होते ते आणि नवे इच्छूक उमेदवार या सर्वांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली होती. अनेकांनी आपापल्या प्रभागांमध्ये स्वतःच्या विजयासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासही प्रारंभ केला होता. अनेकांनी आपल्याला आमदाराचा तसेच पक्षाचा पाठिंबा मिळावा, यासाठी आमदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारभ केला होता. त्याचबरोबर पक्षाचा पाठिंबा मिळावा म्हणून पदाधिकाऱयांच्या गाठीभेटी घेऊन आपले घोडे पुढे दामटण्याचाही प्रयत्न चालविला होता. मात्र आता ही निवडणूक पावसाळय़ानंतर होणार असल्याने सर्वांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. तरीही काहीजण वाढीव मिळालेल्या वेळेमुळे आनंदी असल्याचेही दिसून येते.









