पहिल्या क्वॉलिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवले
कोलकाता / वृत्तसंस्था
अवघ्या 38 चेंडूत 3 चौकार व 5 उत्तुंग षटकारांसह 68 धावांचा झंझावात साकारणाऱया डेव्हिड मिलरच्या विस्फोटक खेळीमुळे गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील फायनलमध्ये जोरदार धडक मारली! मंगळवारी येथील ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत राजस्थानने 6 बाद 188 धावांची आतषबाजी केली. पण, गुजरातनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत 19.3 षटकात 3 बाद 191 धावांसह 7 गडय़ांनी एकतर्फी विजय नोंदवला.
राजस्थानच्या 188 धावांमध्ये जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची आतषबाजी केली. पण, प्रत्युत्तरात गुजराततर्फे मिलर (नाबाद 68) व हार्दिक पंडय़ा (नाबाद 40) यांनी 10 षटकात 106 धावांची अभेद्य भागीदारी साकारत आपण सव्वाशेर असल्याचे अधोरेखित केले.
विजयासाठी 189 धावांच्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब स्वरुपाची झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा बोल्टच्या डावातील दुसऱयाच चेंडूवर यष्टीमागे सॅमसनकडे झेल देत बाद झाला, त्यावेळी त्याला आपले खातेही उघडता आले नव्हते.
नंतर सलामीवीर शुभमन गिल (21 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 35) व मॅथ्यू वेड (30 चेंडूत 6 चौकारांसह 35) यांनी 72 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शुभमन गिल समन्वयात गोंधळ उडाल्यानंतर धावचीत होत परतला तर मॅथ्यू वेडने मकॉयच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवरील बटलरकडे सोपा झेल दिला. मॅथ्यू वेड बाद झाला, त्यावेळी गुजरातची 9.3 षटकात 3 बाद 85 अशी स्थिती होती. त्यानंतर हार्दिक पंडय़ा व डेव्हिड मिलर यांनी अचानक चौफेर फटकेबाजी करत या सामन्यात रंग भरला.
जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्यावर भर देत या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर दडपण राखण्यात यश मिळवले. या उभयतांच्या फटकेबाजीमुळेच गुजरातचा संघ शेवटच्या टप्पयात सहज विजय संपादन करु शकेल, असे चित्र निर्माण झाले. अगदी अव्वल फिरकीपटू चहलच्या गोलंदाजीवर देखील फटकेबाजी केली गेल्यानंतर राजस्थानच्या आशाअपेक्षांना जोरदार धक्का बसला.

, बटलरला नशिबाची उत्तम साथ लाभल्यानंतर त्याने याचा पुरेपूर लाभ घेत धडाकेबाज अर्धशतक झळकावले आणि या बळावर राजस्थानने 6 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली. ऑरेंज कॅप होल्डर बटलरला या हंगामातील दुसऱया टप्प्यात अपेक्षित सूर सापडत नव्हता. यामुळे, त्याच्यावर दडपण देखील होते. पण, आजच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याने स्लो स्टार्टनंतरही जोरदार फटकेबाजी केली आणि गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले.
कर्णधार संजू सॅमसनने 26 चेंडूत 47 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. मध्यंतरी बटलरला किंचीत झगडावे लागले, त्यावेळी सॅमसनने तुफान फटकेबाजी केली. सॅमसन-बटलर जोडीने 68 धावांची भागीदारी केली.
पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणाला सुरुवात करत त्याने धावफलक सातत्याने हलता ठेवण्यावर भर दिला. मोहम्मद शमी व अल्झारी जोसेफ हे गुजरातचे वेगवान त्रिकुट लाईन अँड लेंग्थवर झगडत राहिले आणि याचा विशेषतः संजूने उत्तम लाभ घेतला. राजस्थानने या बळावर 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 55 अशी उत्तम सुरुवात केली होती.
रशिदचा भेदक मारा
राजस्थानचे फलंदाज भारी ठरत जाणार, असे संकेत असताना येथील ड्राय विकेटवर रशिद खानने विशेषतः बटलरला स्ट्राईक रोटेट करण्यापासून सातत्याने रोखून धरले. आपल्या दुसऱया षटकात तर त्याने केवळ दोनच धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 6 बाद 188 (जोस बटलर 56 चेंडूत 12 चौकार, 2 षटकारांसह 89, संजू सॅमसन 26 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 47, देवदत्त पडिक्कल 20 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 28. अवांतर 11. हार्दिक पंडय़ा 1-14, रविश्रीनिवासन साई किशोर 1-43, शमी 1-43, यश दयाल 1-46).
अवैध चेंडू, तरीही राजस्थानचे दोन फलंदाज बाद!
राजस्थानच्या डावातील शेवटच्या षटकात यश दयाल गोलंदाजी करत असताना चेंडू अवैध असून देखील जोस बटलर व रियान पराग असे दोघे फलंदाज बाद झाले. षटकात 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला असताना दयालने शेवटचा चेंडू नोबॉल टाकला आणि बटलर यावेळी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर फ्री हिट असताना दयालचा चेंडू वाईड होता आणि यावेळी नॉन स्ट्रायकर एण्डवरील रियान परागला धावचीत व्हावे लागले. अशा तऱहेने सहावा चेंडू वैध नसताना राजस्थानला सलग 2 फलंदाज गमवावे लागले.
गुजरातचे खराब क्षेत्ररक्षण राजस्थानच्या पथ्यावर
बटलर दोन जीवदाने लाभल्याने तो सुदैवी ठरला. प्रारंभी, 43 धावांवर असताना सोपा झेल घेण्याची संधी असताना हार्दिक पंडय़ा पाय घसरुन पडला तर 69 धावांवर असताना रशिदने बटलरचा आणखी एक झेल सोडला.
या जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत बटलरने अल्झारी जोसेफला एकाच षटकात 3 चौकार फटकावले आणि आक्रमक पवित्र्याचा पहिला दाखला दिला. शेवटच्या षटकात धावचीत होत तंबूत परतण्यापूर्वी त्याने गुजरातच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली.
बटलरकडून हंगामात 718 धावांची आतषबाजी
पहिल्या क्वॉलिफायर सामन्याअखेर बटलरने या हंगामात आता 15 सामन्यात 718 धावांची आतषबाजी केली असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त्याचे अव्वलस्थान आणखी भक्कम झाले आहे. मंगळवारी बटलरने 56 चेंडूतील खेळीत 12 चौकार व 2 उत्तुंग षटकार फटकावले.
प्रारंभी 38 चेंडूत 39 धावा, त्यानंतर अवघ्या 18 चेंडूत 50 धावा!
सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या बटलरने येथील 89 धावांच्या खेळीत पहिल्या 38 चेंडूत फक्त 39 धावाच केल्या होत्या. पण, नंतर त्याने अवघ्या 18 चेंडूत 50 धावा झोडपल्या आणि यामुळे गुजरातच्या प्रयत्नांवर मर्यादा राहिल्या.
धावफलक
गुजरात टायटन्स ः 19.3 षटकात 3 बाद 191 (डेव्हिड मिलर 38 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 68, हार्दिक पंडय़ा 27 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 40, मॅथ्यू वेड 35, शुभमन गिल 35. अवांतर 13. बोल्ट व मकॉय प्रत्येकी 1 बळी).
शेवटच्या षटकात काय घडले?
गुजरातला शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता असताना प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने लाँगऑनकडे उत्तुंग षटकार खेचत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर 5 चेंडूत 10 धावा असे समीकरण असताना डीप स्क्वेअरलेगकडे आणखी एक उत्तुंग षटकार खेचत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले. अर्थात, मिलरचा धडाका इथेच अजिबात थांबला नाही. शेवटच्या 4 चेंडूत 4 धावा आवश्यक असताना त्याने डीप मिडविकेटकडे आणखी एक तुफानी षटकार खेचला आणि गुजरातच्या धडाकेबाज विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले!









