दोडामार्ग – वार्ताहर-
तिलारी खोऱ्यातील रानटी हत्तींच्या वाढत्या संचार व उच्छादाच्या पार्श्वभूमीवर हत्ती येत असल्याची सूचना आता अगोदरच मिळणार आहे. हत्ती बाधित गावात सौरऊर्जा व बॅटरीवर चालणारे सेन्सर बसविण्यात आला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मोर्ले या ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आले असून त्याचा रिझल्ट मिळण्यानंतर अन्य हत्ती बाधित गावांमध्ये देखील ही यंत्रणा राबविली जाणार आहे. बांदा येथील कोरबेटी फौंडेशन तर्फे हे सेन्सर बसविण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसात तिलारी खोऱ्यातील बऱ्याच गावात हत्तींचा कळप मुक्तपणे फिरत आहे. शेती बागायतींनमध्ये नुकसानी करत फिरणारे हे हत्ती आता थेट गावांत दाखल होऊन घरासमोरील अंगणात येऊन पोचले आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांत विशेषतः सायंकाळ झाल्यानंतर घबराटीचे वातावरण असते. मात्र आता हत्ती येत असल्याची सूचना या सेन्सर सायरन वाजून मिळणार आहे. सदर सेन्सर च्या शंभर मीटरच्या कार्यकक्षेत हत्ती येताच सायरन वाजून हत्ती वर प्रकाशझोत पडणार आहे. सायरनच्या आवाजाने हत्ती कुठे आहेत त्यांची तात्काळ माहिती आसपासच्या घरांना मिळणार आहे. सौरऊर्जा व बॅटरी या दोहोंच्या साहाय्याने ही सेन्सर यंत्रणा काम करणार असून मोर्ले येथे प्रायोगिक तत्वावर सेन्सर बसविण्यात आले आहे. ही यंत्रणा बसवितेवेळी वनक्षेत्रपाल ए. आर. कन्नमवार, माजी सरपंच गोपाळ गवस, सरपंच महादेव गवस, रमाकांत गवस, अविनाश गवस, प्रथमेश गवस, अजित गवस, अंकुश गवस, वनपाल श्री. शिरवल, निलेश गवस, यशवंत गवस आदी मोर्ले ग्रामस्थ होते.









