पहिल्या क्वॉलिफायर लढतीत पदार्पणवीर गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स आमनेसामने
कोलकाता / वृत्तसंस्था
अव्वल दर्जाचे भेदक गोलंदाज आणि एकापेक्षा एक सरस फिनिशर्सच्या बळावर विशेष महत्त्वाकांक्षी असलेल्या पदार्पणवीर गुजरात टायटन्सचा आज (मंगळवार दि. 24) राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला क्वॉलिफायर सामना होत आहे. मजबूत फिरकी लाईनअप हे राजस्थान रॉयल्सचे बलस्थान आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेल्या या संघांमधील लढतीच्या माध्यमातून यंदाच्या फायनलमधील पहिला मानकरी निश्चित होईल. आजच्या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
आयपीएल इतिहासात प्रथमच एखाद्या प्रँचायझीचे नेतृत्व साकारत असलेल्या हार्दिक पंडय़ाने या हंगामात स्वतः पुढाकाराने लढत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर विशेष लक्षवेधी खेळ साकारला. गुजरातचा संघ अव्वलस्थानासह प्ले-ऑफसाठी पात्र ठरला, यात पंडय़ाचे योगदान खास राहिले. चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरत धावांची आतषबाजी करायची असेल किंवा रशिद खानसह डेथ बॉलिंगमध्ये धमाका करायचा असेल, पंडय़ा नेहमीच अग्रेसर राहिला. आजच्या लढतीतही त्याचे योगदान महत्त्वाचे असणार आहे.
आघाडीची फलंदाजी लाईनअप ही त्यांच्या दृष्टीने थोडीफार चिंतेची बाब राहत आली आहे. शुभमन गिल आश्वासक प्रारंभानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकलेला नाही. त्या तुलनेत अनुभवी वृद्धिमान साहाने मात्र अपेक्षेपेक्षाही उत्तम खेळ साकारला आहे. राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या साहाने आघाडीवर फलंदाजीला उतरत 9 सामन्यात 3 अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. गिल खराब फॉर्ममध्ये असला तरी साहाच्या योगदानामुळे ती कसर भरुन निघत आहे.
अफगाणचा लेगस्पिनर रशिद खान मधल्या व शेवटच्या काही षटकात काटेकोर मारा करत आला असून भारतीय संघातील अनुभवी, वरिष्ठ गोलंदाज मोहम्मद शमीने देखील परफेक्ट स्टार्ट मिळवून दिले आहेत. या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये शमी 11 बळींसह अव्वल राहिला आहे.
उर्वरित सामने नव्या खेळपट्टीवर
प्ले-ऑफचे सामने नव्या खेळपट्टीवर होणार असल्याने सीमर्सवर मुख्य भिस्त असेल आणि पंडय़ा-अल्झारी जोसेफसह लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी या परिस्थितीत परिणामकारक मारा करु शकतात. यापूर्वी साखळी फेरीतील लढतीत टायटन्सने राजस्थानवर 37 धावांनी मात दिली. मात्र, उद्घाटनाच्या हंगामात विजेतेपद मिळवणारा राजस्थानचा संघ फिरकीतील बलस्थानामुळे केव्हाही मुसंडी मारुन वर येऊ शकतो. टायटन्सला मागील 5 सामन्यात 3 पराभव पत्करावे लागले असून शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना आरसीबीने देखील 8 गडी राखून धूळ चारली होती. त्यामुळे, गुजरातला येथे नवी रणनीती आखावी लागेल.
नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा
टायटन्सचे 4 पैकी 3 पराभव आणि रॉयल्सचे 5 पैकी 4 पराभव प्रथम फलंदाजी करताना झालेले आहेत. त्यामुळे, नाणेफेकीचा कौल गमवावा लागू नये, याकडेही दोन्ही संघांचा कल असेल.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल, कॉर्बिन बॉश.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
दोन्ही ‘कॅप होल्डर्स’ राजस्थानचेच!
साखळी फेरीअखेर सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत जोस बटलर व सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये यजुवेंद्र चहल आघाडीवर असून हे दोन्ही खेळाडू राजस्थान रॉयल्सचेच आहेत. याशिवाय, या संघातील रविचंद्रन अश्विनसारखा अष्टपैलू खेळाडू उपयुक्त योगदान देण्याची क्षमता राखून असेल. यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीत शिमरॉन हेतमेयर व रियान पराग या नियमित फलंदाजांऐवजी अश्विनला पसंती देण्यात आली आणि अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावांची आतषबाजी करत संघाला 5 गडय़ांनी रोमांचक विजय प्राप्त करुन दिला होता. त्या विजयामुळेच राजस्थानला पहिल्या दोन संघात स्थान निश्चित करता आले. मात्र, 2008 मधील आयपीएल विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी रॉयल्सला केवळ अश्विनवर अवलंबून न राहता सांघिक खेळावर भर देणे आवश्यक असेल.
जोस बटलर सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी विराजमान असला तरी मागील 3 सामन्यात तो 2, 2 व 7 अशा किरकोळ धावांवर बाद झाला आहे. इंग्लिशमन बटलरने या हंगामात त्यापूर्वी 3 शतके व 3 अर्धशतके झळकावली असली तरी मागील 5 डावात तो एकही अर्धशतक पूर्ण करु शकलेला नाही. त्यामुळे, त्याला येथे सूर गवसणे या प्रँचायझीसाठी विशेष महत्त्वाचे असेल.
सॅमसन व हेतमेयर खराब फॉर्ममध्ये असल्याने याचा त्यांना फटका बसत आला असून येथे अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी या दोघांना सूर सापडणे संघासाठी महत्त्वाचे असणार आहे.
बॉक्स
खेळात व्यत्यय आल्यास सुपरओव्हर, सुपरओव्हरही शक्य नसल्यास गुणांकनावर निकाल
आयपीएल स्पर्धेतील बाद फेरीला आजपासून प्रारंभ होत असताना उर्वरित सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय येण्याचीही दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारणामुळे खेळात व्यत्यय आल्यास सुपरओव्हरचा अवलंब केला जाणार आहे आणि जर सुपरओव्हरही शक्य नसेल तर साखळी फेरीतील कामगिरीच्या आधारे विजेता निश्चित केला जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयपीएल कार्यकारिणीने केली. क्वॉलिफायर-1, एलिमिनेटर, क्वॉलिफायर-2 या सामन्यांना हा नियम लागू असणार आहे. या सर्व लढतींना राखीव दिवस नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेतील फायनल दि. 29 मे रोजी होत असून त्या दिवशी व्यत्यय आल्यास 30 मे हा दिवस यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत गुजरात-राजस्थान आज आमनेसामने भिडणार असून लखनौ सुपर जायंट्स व आरसीबीचे संघ याच ठिकाणी दुसऱया दिवशी एलिमिनेटर लढतीत आपली ताकद आजमावतील. स्पर्धेतील दुसरी क्वॉलिफायर व फायनल अनुक्रमे शुक्रवारी व रविवारी अहमदाबादमध्ये होणार आहेत.
‘प्ले-ऑफ सामन्यांमध्ये खेळात व्यत्यय येत असल्यास सर्वप्रथम षटकात कपात करण्याचा पर्याय विचाराधीन असेल. दोन्ही संघांना किमान 5 षटके फलंदाजी करता यावी, यासाठी आमचे प्रयत्न असतील. पण, 5 षटकांचा खेळही शक्य नसेल तर अशा परिस्थितीत शक्य असल्यास सुपरओव्हरचा अवलंब केला जाईल. ते ही शक्य नसेल तर गुणतालिकेत 70 सामन्यानंतर जो संघ सरस असेल, त्याला विजेता घोषित केले जाईल’, असे आयपीएल कार्यकारिणीने याप्रसंगी जाहीर केले.
दुसऱया डावात व्यत्यय आल्यास डकवर्थ लुईसचा पर्याय
दोन क्वॉलिफायर्स व एलिमिनेटर लढतीत जर एक डाव पूर्ण झाला असेल, पण, दुसऱया डावात खेळ शक्य होत नसेल तर अशा परिस्थितीत डकवर्थ-लुईस पद्धत अंमलात आणली जाणार आहे. दि. 29 मे रोजी फायनल लढतीत व्यत्यय आल्यास त्यावेळी किमान एक चेंडू टाकला गेला तरी पुढील दिवशी त्यापुढे खेळाला सुरुवात केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.









