आमदारांना मुख्यमंत्री नितीश कुमारांचा निर्देश ः मोठा निर्णय होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या राजकारणात जबरदस्त घडामोडी घडत आहेत. एकीकडे लालू प्रसाद यादव यांचा राजद भाजप तसेच केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे भाजपसोबत राज्यात आघाडी सरकार चालविणाऱया नितीश कुमार यांनी पुढील 72 तासांपर्यंत स्वतःच्या पक्षाच्या सर्व आमदारांना पाटण्यातच राहण्याचा निर्देश निर्देश दिला आहे. या निर्देशानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारमध्ये उलथापालथ होण्याची चर्चा यात सामील असली तरीही नितीश यांचे निकटवर्तीय या चर्चेला फेटाळून लावत आहेत. पुढील 72 तास राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारीच संयुक्त जनता दलाच्या कार्यालयात मंत्री तसेच आमदारांसह माजी आमदारांशी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. मागील काही काळात नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. राबडी देवी आणि लालू यादवांनी नितीश यांना यापूर्वीही इफ्तार पार्टीला अनेकदा बोलाविले होते. परंतु नितीश कधीच त्यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले नव्हते. परंतु यावेळी नितीश यांनी तेजस्वी यांच्या निवासस्थानी चालत जात इफ्तार पार्टीत भाग घेतला होता.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या निर्देशाला जातीय जनगणनेवर 27 मे रोजी होणाऱया बैठकीशी देखील जोडून पाहण्यात येत आहे. बिहारमध्ये जातीय जनगणनेवरून राजकारण तापले आहे. एकीकडे जनगणनेवरून संजद आणि राजद यांचे सूर जुळले आहेत, तर भाजपचा मात्र याला विरोध आहे. याचमुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून जातीय जनगणनेच्या मागणीकरता 27 मे रोजी बैठक निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नितीश यांनी 27 मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीचा एकमात्र उद्देश बिहारमध्ये जातीय जनगणनेवरून एकमत तयार करणे आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी या बैठकीचे निमंत्रण मिळाले असल्याची माहिती दिली आहे.
यापूर्वी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यावर नितीश कुमार यांनी सर्वपक्षीय बैठकीत यासंबंधी निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. भाजपचा विरोध असूनही नितीश कुमार हे बिहारमध्ये जातीय जनगणना करविण्याची तयारी करत आहेत.
विरोधी पक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी जातीय जनगणना न झाल्यास पाटण्यापासून दिल्लीपर्यंत मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला होता. बिहारमधील रालोआत विश्वासाची कमतरता असून भाजप आणि नितीश कुमार हे परस्पर निर्णय घेत आहेत. छोटय़ा पक्षांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत नसल्याचे मांझी यांनी म्हटले आहे.









