ऑनलाईन टीम तरुण भारत :
केदारनाथ धाम सहित संपूर्ण रुद्रप्रयागच्या वाटेवर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्व तीर्थयात्री केदारनाथमध्ये भगवान महादेवांच्या दर्शनाची वाट पाहत असले तरी जिल्हा प्रशासनाने रुद्रप्रयाग पासून गौरिकुंड पर्यंत यात्रेकरूंना पुढे जाण्यास अटकाव केला आहे. हजारो यात्रकेरू विविध ठिकाणी अडकले आहेत. सकाळी ५ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
वातावरण सुरळीत झाल्यानंतरच सर्व यात्रेकरूंना केदारनाथला पाठवले जाणार आहे. यापूर्वी हवामान खात्याने २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे जाहीर केली होते. गौरीकुंड,सोनप्रयाग, गुप्तकाशी,अगस्त्यमुनी आणि रूद्रप्रयाग मध्ये हजारो भाविक अडकले आहेत. पाऊस आणि धुक्यामुळे प्रशासनाला नाईलाजाने सर्व यात्रेकरूंना थांबवावे लागत आहे.
साधारणपणे ८ ते १० हजार प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. खराब हवामानामुळे प्रशासनाने हेलिकॉप्टर सेवा सुद्धा बंद केली आहे. हवामान पूर्ववत होण्याची सर्व यात्रेकरू वाट पाहत आहेत.









