कोल्हापूर/विनोद सावंत
दिवसभर व्यवसाय करायचा, पैसा कमवायचा आणि रात्री जाताना कचरा रस्त्यात टाकून जायचे, असा प्रकार महाद्वार रोडवरील फेरीवाले आणि काही व्यावसायिकांकडून सुरू आहे. त्यामुळे एकट्या महाद्वार रोडवर रोज एक डंपर प्लास्टिक कचरा पडलेला असतो. तो संकलित करण्यासाठी रात्रीच्यावेळी मनपाच्या कर्मचाऱयांची दमछाक होते. दोन वेळा टिपर येऊनही त्यामध्ये कचरा टाकण्यास अळस केला जात असल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर महापालिकेचा शहर कोंडाळामुक्त करण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने कचरा उठावासाठी १७५ टिपर खरेदी केलेत. रोज सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात कचरा उठाव होतो. यामध्ये व्यावसायिकांच्या कचरा उठावासाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवली आहे. यामुळे शहरातील बहुतांशी परिसरातील केंडाळे काढले आहेत. असे असताना टिपरमध्ये कचरा टाकण्याऐवजी अद्याप रस्त्यावरच टाकला जातो. महाद्वार रोडवर तर फेरीवाले आणि काही व्यावसायिक दिवसभर साचलेला कचरा रात्री जाताना रस्त्यावरच टाकून जात असल्याचे आढळले आहे. परिणामी रात्री १० नंतर महाद्वार रोडच्या दोन्ही बाजूने प्लास्टीक कचऱयाचे साम्राज्य पसरलेले दिसते. महापालिकेकडून संकलित झालेला कचरा डंपरमधून थेट झुम प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रियेसाठी टाकला जातो.
कर्मचाऱ्यांची डोकेदुखी
महाद्वार रोड, ताराबाई रोड येथील कचरा उठाव करण्यातच मनपा कर्मचाऱ्यांची रात्र जाते. याचबरोबर महाद्वार रोडवर टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांसह काही नागरिक खराब झालेले जेवण टाकतात. त्यामुळे कचरा उठावासाठी रात्री येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्लास्टिक आणि इतर कचरा वेगळा करता येत नाही. असा कचरा संकलन करणे कर्मचाऱ्यांना डोकेदुखीचे ठरते.
कारवाई कोणावर?
राज्यात प्लास्टिक बंदी आहे. महापालिकेचे पथक प्लास्टिक वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करत आहे. महाद्वार रोडवर पडणारे प्लास्टिक हे नवीन कपडय़ांचे पॅकिंग केलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमकी कारवाई कोणावर करायची हा प्रश्न आहे.
शहरात रोज संकलित होणारा कचरा -२१० टन
प्लास्टिक – ५ टन
महाद्वार रोडवर रोज संकलित होणारा कचरा – १ डंपर
प्रथम जनजागृती नंतर दंडात्मक कारवाई करू
महाद्वार रोडवरील कचरा उठावासाठी दोनवेळा टिपर सेवा दिली जाते. तसेच एकटी संस्थेमार्फत स्वतंत्र कचऱयाचे संकलन केले जाते. तरीही कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. टिपरमध्ये कचरा टाकण्यासंदर्भात जनजागृती केली जाईल. त्यातूनही बदल झाला नाही तर दंडात्मक कारवाई करू.
जयवंत पोवार, मुख्य आरोग्य निरिक्षक, मनपा
बेशिस्त फेरीवाल्यांना कडक सूचना कराव्यात
महापालिकेने बेशिस्त फेरीवाल्यांनी टिपरमध्येच कचरा टाकावा. तसेच रात्री घरी जाताना रस्त्यावर कचरा टाकू नये, अशा सूचना केल्या पाहिजेत. त्यातूनही कचरा टाकला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
किरण नकाते, अध्यक्ष, महाद्वार रोड व्यावसायिक असोसिएशन









