मंदिराच्या ठिकाणी पाहणी, पोलिसांना ताबडतोब छडा लावण्याचे निर्देश
वार्ताहर /केपे
केपे येथील श्री दत्तमंदिरात झालेल्या चोरी प्रकरणाची दखल घेऊन स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी रविवारी देवस्थानाची पाहणी केली. या चोरीचा ताबडतोब छडा लावावा असा निर्देश आपण पोलिसांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. कुशावती नदीच्या तिरी असलेल्या दत्तमंदिरात शुक्रवारी रात्री 2.30 ते 3.30 च्या दरम्यान घुसून चोरांनी फंडपेटीतून सुमारे 40 हजारांची रक्कम चोरली होती.
काही दिवसांपूर्वी मंदिराचा 50 वा वर्धापनदिन साजरा केला होता. त्यामुळे या परिसराचा परिचय असलेल्या व्यक्ती यात गुंतलेल्या असू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तीन चोर मंदिरात घुसून त्यांनी मिळून फंडपेटी मागच्या दाराने बाहेर नेली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले आहे. त्यानंतर कुशावती नदीच्या तिरी जाऊन ती फंडपेटी फोडण्यात आली. एका वर्षापूर्वी मंदिरात अशीच फंडपेटी फोडण्याचा प्रकार घडला होता.
चोरी केलेल्यांना मंदिर परिसराची बरीच माहिती असावी असा अंदाज काढण्यात येत आहे. त्याचमुळे कोणाच्या नजरेत येऊ नये याकरिता कुशावती नदीचा मार्ग धरून ते देवळात शिरले असावेत असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याच मार्गाने त्यांनी फंडपेटी नेऊन कुशावती नदीच्या काठी ती फोडली व रक्कम घेऊन पसार झाले.
या घटनेचा आमदार डिकॉस्ता यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावावा असा निर्देश आपण पोलिसांना दिलेला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता धार्मिक स्थळांच्या परिसरांत पोलीस गस्त घालण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली जाईल. मुख्य रस्त्याजवळच्या जागांवर असे प्रकार घडायला लागले, तर हे बरेच चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.
ही चोरीची घटना घडण्यापूर्वी पोलीस मुख्य रस्त्यावरून गस्त घालून गेले होते. हा मोठा परिसर असल्याने व पोलिसांकडे हवे तसे संख्याबळ नसल्याने केपे पोलीस स्थानकावरील संख्याबळ वाढविण्याची मागणी सरकारकडे करू. तसेच जे कोणी गोव्याबाहेरून येतात अशा व्यक्तींना भाडेकरू म्हणून ठेवताना त्यांची पोलिसांमार्फत नीट पडताळणी करून घेणे गरजेचे आहे, असे डिकॉस्ता यांनी सागितले. या प्रकरणात केपे पोलीस पुढील तपास करत आहेत.









