इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चर्चा अपेक्षित ः 23-24 ला पंतप्रधान मोदी जपान दौऱयावर
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ते 24 मे दरम्यान जपान दौऱयावर जाणार आहेत. टोकियो येथे होणाऱया क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेत क्वाडमधील 4 देशांचे नेते ‘क्वाड’मध्ये होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतील. चार क्वाड देशांच्या नेत्यांच्या बैठकीत पटलावरील मुद्यांबरोबरच ऐनवेळी चर्चेत आलेले विषयही समाविष्ट असतील. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडी आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्यांवरही विचार मांडू, असे पंतप्रधान म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चर्चेच्या निमित्ताने चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न ‘क्वाड’कडून केला जाऊ शकतो.
दोन दिवसीय (23-24 मे) जपान दौऱयावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एक निवेदन जारी केले आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून टोकियोला भेट देणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. क्वाड सुरक्षा परिषदेत भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नेते सहभागी होतील. ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज प्रथमच क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली.
क्वाड परिषदेमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींसह परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवर विचार मांडण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच या बैठकीमध्ये चारही नेत्यांमध्ये समोरा-समोर चर्चा होणार असल्याने चार देशांच्या नेत्यांनी एकत्रितपणे उचललेल्या पावलांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी देईल, असेही ते म्हणाले. व्यापक धोरणात्मक भागिदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्यावर चर्चा करण्यासाठी आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांचा हा दौरा 40 तासांचा म्हणजे जवळपास दोन दिवसांचा असणार असून ते या कालावधीत तब्बल 23 कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. पंतप्रधानांचा हा जपान दौरा राजनयिक, आर्थिक आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही सांगण्यात आले.
जपान-अमेरिकेशी ‘वन-टू-वन’ संवाद
जपानच्या दौऱयात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत. रशिया आणि युपेनमधील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बायडेन यांच्याप्रमाणेच जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी पंतप्रधान मोदी वन टू वन संवाद साधतील. यामध्ये दोन्ही नेते बहुआयामी संवाद वाढवण्याबरोबरच द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा करतील. तसेच द्वयींमध्ये प्रादेशिक घडामोडी आणि समकालीन जागतिक मुद्यांवरही संवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी उत्सुक असल्याचे सांगतानाच जपानमधील भारतीय समुदायालाही संबोधित करणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे.









