गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर खोचक टीका
वृत्तसंस्था/ ईटानगर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशचा दोन दिवसीय दौरा केला आहे. स्वतःच्या दौऱयाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच रविवारी शाह हे नामसाई जिल्हय़ात पोहोचले. तेथे त्यांनी 1 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच कार्यांचा शुभारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार अरुणाचलसोबत नेहमीच उभे राहणार असल्याचे म्हणत शाह यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना गृहमंत्र्यानी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते 8 वर्षांमध्ये काय घडले अशी विचारणा करतात. असे लोक डोळे बंद करून वावरू पाहत आहेत. राहुल गांधींनी स्वतःचा इटालियन चष्मा काढावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडून करण्यात आलेल्या विकासकामांकडे पहावे अशी उपरोधिक टिप्पणी शाह यांनी केली आहे.
गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी तिराप जिल्हय़ातील रामकृष्ण मिशन स्कुलच्या सुवर्णमहोत्सवी सोहळय़ात सामील झाले होते. यादरम्यान त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्यातील आंतरराज्य सीमा वाद चालू वर्षी निकाली निघू शकतो असे म्हटले हेते.
पूर्ण ईशान्य भारताला उग्रवादमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून 8 वर्षांमध्ये ईशान्येत 9 हजार उग्रवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू देखील उपस्थित होते.
आसाम आणि मेघालय यांच्यातील सुमारे 60 टक्के आंतरराज्य सीमा वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडविण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमधील उर्वरित वाद 2023 पूर्वी सोडविण्यात येईल असा मला विश्वास आहे. दोन्ही राज्यांमधील सरकार या दिशेने काम करत आहे. ईशान्येत शांतता आणि विकासाकरता केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे. ईशान्येतील युवक आता बंदूक आणि पेट्रोल बॉम्बसह दिसून येत नाहीत. त्यांच्याकडे आता लॅपटॉप असून ते आता स्टार्टअप सुरू करत असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.









