पिंपरी / प्रतिनिधी :
देशात पद्धतशीरपणे द्वेषाचे राजकारण खेळले जात आहे. भोंगे, हनुमान चालीसा, मंदिर – मशीद असा वाद उकरुन महागाई, भ्रष्टाचार, देशाची सुरक्षितता या मुद्दयांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यात येत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रविवारी येथे केला. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही असेही आझमी यावेळी म्हणाले.
समाजवादी पक्षाची पत्रकार परिषद रविवारी पिंपरीत घेण्यात आली. त्यावेळी अबु आझमी यांनी देशातील आणि राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, उपाध्यक्ष बी.डी.यादव उपस्थित होते.
आझमी म्हणाले, देशाची परिस्थिती कठीण होत चालली आहे. कोणी भोंगे, कोणी मशिदी, कोणी मंदिरांबद्दल बोलत आहे. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही. राज्यघटनेच्या विरोधात धर्माला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, विमानतळ, विमान कंपन्या, बंदरे सर्रास विकली जात आहेत. खासगीकरणामुळे आरक्षणावर गंडांतर येणार आहे. एकीकडे सार्वजनिक कंपन्या – उपक्रमांचे खासगीकरण सुरु असताना राजधानी दिल्लीत संसद भवनासह इतर बांधकामांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा चुराडा केला जात आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशात मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी लाकडे नव्हती. रुग्णालयांमध्ये साधी औषधे नव्हती. मृतदेह अक्षरश: नद्यांमध्ये वाहत होते.मात्र, केंद्र सरकारला विकासाऐवजी धर्मामध्ये रस असून केवळ मंदिर – मशीदींचा वाद उकरुन काढला जात आहे.








