वेंगुर्ले (वार्ताहर)-
देशात महाराष्ट्रातील काजूगर दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे. महाराष्ट्राचा काजू व त्याचा दर्जा व चव उच्च प्रतिची असल्याने जगभरातील ग्राहकांची पसंती महाराष्ट्राच्या काजूला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काजू उद्योजक माल घेताना तो परिपक्व पहातात. त्याची साठवण करताना आवश्यक ती उपाय योजना राबवितात. मालाचा दर्जा ठेवूनच तो ग्राहकांसमोर आणतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या काजूची मागणी हि देशविदेशांत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कॅश्यु मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी दिल्ली येथील काजू उत्पादकांची `बायर सेलर मीट’ सेमिनारमध्ये बोलताना केले.
दरम्यान, महाराष्ट्र कॅश्यु मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी महाराष्ट्राच्या काजू व त्याचा दर्जा याबाबत दिलेल्या विस्तृत माहितीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यातील मोठे खरेदीदार अध्यक्ष व असोसिएशन टीमला भेटले. त्यामुळे उत्तरेकडील अनेक राज्यांनी महाराष्ट्राचा काजू खरेदीकडे धाव घेतली आहे.
काजू इंडीयातर्फे प्रथमच देशस्तरीय दि. 20 व 21 मे रोजी दिल्ली येथे हॉटेल विवांता द्वारका येथे काजू उत्पादकांचे आयोजित केलेले `बायर सेलर मीट’ सेमिनार महाराष्ट्र कॅश्यु मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यामध्ये भारतातील काजूगर उत्पादित करणाऱ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरीसा, तामिळनाडू, केरळ, गुजराथ, पश्चिम बंगाल, कलकत्ता यासह सर्व राज्यांनी भाग घेतला. तसेच भारतातील उत्तरेकडील राज्यांना काजूगर पुरविण्यासाठी तेथील व्यापारी विक्रेत्याबरोबर भेटीगाठी घेतल्या. यामध्ये महाराष्ट्र कॅश्यु मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपिन वरस्कर, खजिनदार सिध्दार्थ झांटये, सदस्य अभिषेक झांटये, स्वप्नील झांटये, दीपक ठाकूर, अंकुश गावडे, विराज शिरोडकर, विद्येश शिरोडकर आदींनी भाग घेतला. महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशन अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा काजू व त्याचा दर्जा याबद्दल विस्तृतपणे भाषण दिले. त्यामुळे उत्तरेकडील अनेक राज्यातील मोठे खरेदीदार अध्यक्ष व असोसिएशन टीमला येवून भेटले. महाराष्ट्रातील काजूगर उत्पादकांचा एक संघटीतपणे विक्री करण्यासाठी आणि त्याची जाहिरात करण्यासाठी माहिती पत्रिका तयार करण्यात आली. त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व उद्योगांना होणार आहे. देशात महाराष्ट्रातील काजूगर दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे. याचा त्यांच्या भाषणात उल्लेख आल्यामुळे सगळय़ांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्टातील सर्व काजू प्रक्रिया उद्योगांना हि एक मोलाची संधी उपलब्ध झाली आहे. याचा नक्कीच महाराष्टातील उद्योगाला फायदा होईल यात दुमत नाही. असेहि बोवलेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी देशातील विविध राज्यातून आलेल्या काजू उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून काजू इंडीयातर्फे सत्कार करण्यांत आला.