आॅनलाईन टीम/ तरूण भारत
कोल्हापूर: पुराचा धोका सतत बसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भिती बसली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. त्यामुळे पुरपठ्यातील पिकांचा विमा भरून घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच विमा भरत असताना निम्मी रक्कम सरकारने दिल्यास निम्मी रक्कम शेतकरी भरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, महापुरात उध्दवस्त होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने उपाययोजना कराव्यात. आमचा विकास विनाशाकडे जात आहे.पिकांचा विमा काढून त्याचे पैसे सरकारने भरावे, काही रक्कम शेतकरी भरतील पण दरवर्षी येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढे यावे विकासाच्या नावाखाली सगळा गोंधळ सुरू आहे, रस्ते तयार करताना भराव टाकला शिरोळ तालुक्यातील शेती पाण्याखाली घालवायची आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्हाला सरकारकडून पैसे नको पण विमा कंपन्यांकडून पैसे मिळाले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भारताची परिस्थिती श्रीलंकासारखी व्हायची नसेल तर रासायनिक खतांच्या किमती कमी केल्या पाहिजेत. उत्पादन कमी झालं तर इतक्या मोठ्या देशाची भूक कशी भागणार. श्रीलंकेने रासायनिक खतांवर बंदी घातली आता त्याचे परिणाम काय दिसतात पहा. रासायनिक खतांवर बंदी घातल्यास देशासमोर अन्न पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने रासायनिक खतांच्या किमती कमी केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.









