विद्यमान नगराध्यक्ष ठरल्याप्रमाणे उतरले नसल्याने अन्य इच्छुक नगरसेवकांमध्ये चलबिचल
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेतील सत्ताधारी गटात झालेल्या अघोषित समझोत्यानुसार ठरलेला सध्याचे नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांचा कार्यकाळ संपला असून त्यामुळे सदर पद आता कोणाच्या गळय़ात पडते या चर्चेला जोर आला आहे. त्याचबरोबर सावंत हे अद्याप उतरले नसल्याने या पदासाठी इच्छुक नगरसेवकांची घुसमट होऊ लागल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
नगरपालिका निवडणूक होऊन निकाल आल्यानंतर कुडचडेचे नगराध्यक्षपद विश्वास सावंत देसाई यांना देण्यात आले होते व तेव्हाच काही नगरसेवकांना क्रमाने नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार सध्या नगराध्यक्षपदावर असलेले सावंत देसाई यांचा एक वर्षाचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण झालेला आहे. तरीही ते अजून पदावरून उतरलेले नसल्याने इच्छुक अन्य नगरसेवकांची घुसमट होऊ लागली असून रांगेत आघाडीवर असलेल्या नगरसेवकांकडून जास्तच नाराजीचा सूर उमटू लागला असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या चालू असलेल्या चर्चेनुसार, सावंत देसाई यांच्यानंतर नगरसेवक प्रमोद नाईक किंवा दामोदर उर्फ प्रसन्ना बेणे यांना संधी देण्यात येणार होती. पण सदर संधी दुसऱयालाच मिळण्याचे संकेत मिळू लागल्याने एकजूट सांभाळून असलेल्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या बाबतीत अगोदर घेतलेल्या निर्णयांत एक माजी नगरसेवक, ज्याला निवडणुकीत हार पत्करावी लागली होती, तो नाक खुपसत असल्याचीही वार्ता आहे.









