अभियंतावर गुन्हे दाखल करण्यासाठी नायब तहसिलदारांना निवेदन
कडेगाव : प्रतिनिधी
टेंभू योजनेचे पाणी नेर्ली खोरा व शाळगाव परीसरात विद्युत पंप व मोठे ट्रान्सफ़र बंद असल्याने दहा गावातील शेतकरी यांची पिके वाळली आहेत. यावर्षी कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गतवेळीपेक्षा निम्याच पाण्याची गरज होती. मात्र टेंभू योजनेच्या आळशी अधिकाऱ्यांमुळे कडेगाव शहरासह तालुक्यातील १० गावांना पाणी मिळाले नाही. आर्वतनाची सुरुवात नोव्हेंबरमध्ये होती मात्र २०२२ या सालात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एक पाण्याचे आवर्तन दिले त्यानंतर मार्च, एप्रिल, में असे तीन महिने उन्हाळी हंगामात पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत.
सुर्ली कामथी कॅनालवरील ट्रान्स्फर मिटर काढून तो खानापूरला नेऊन तेथील बंद ट्रान्स्फर मिटर आणून येथील शिवाजीनगर तलावातील पंप हाऊस येथे बसविण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी कडेगाव तालुक्यातील शेतकरी यांना वाऱ्यावर सोडून खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय करून कडेगाव तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लावला. तालुक्यातील शेतकरी वर्गाने तक्रार केल्यावर बंद पडलेली मशिनरी आणली. यामुळे शेतकरी यांच्यात असंतोष आहे. तालुक्यातील विद्यमान आमदारांकडे कृषीखाते असूनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली.
आज कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर नुकसान भरपाई द्या. नाहीतर जबाबदार टेंभू अधिकारी राजन रेडिय्यार व उपविभाग अधिकारी तुषार पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांना दिले.यावेळी डी.एस. देशमुख, अभिमन्यू वरुडे, जीवन करकटे, राहुल चन्ने, मोहन जाधव, दिपक न्यायनीत, राजोबा माने यासह पाणी संघर्ष समिती पदाधिकारी उपस्थित होते.