ग्राम पंचायतीसमोर कचरा टाकून आंदोलन : कचऱयाचे ढीग साचल्याने गावात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वार्ताहर /सांबरा
मुतगा ग्रामपंचायत कचऱयाची उचल करण्यास अपयशी ठरल्याचा निषेधार्थ मंगळवारी श्रीराम नगर, गोकुळ नगर व साई नगर येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला व ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन छेडले व जोपर्यंत कचऱयाची उचल करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली.
अलीकडच्या काळामध्ये ग्रामपंचायतीमार्फत वेळेवर कचऱयाची उचल करण्यात येत नाही. परिणामी श्रीराम नगर, गोकुळ नगर व साई नगर या वसाहतींमध्ये ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी तर खुली जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेक वेळा सांगूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तसेच या भागातील ग्रामपंचायत सदस्य रवि कोटबागी व मीरा देशपांडे यांनीही अनेकवेळा कचऱयाची उचल करण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर तेथील नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामपंचायतीमार्फत काही महिन्यापूर्वी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून घंटागाडीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी मोर्चाने जाऊन ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकला व आंदोलन छेडले. यावेळी पंचायत विकास अधिकारी बी. डी. कडेमनी यांनी लवकरात लवकर कचऱयाची उचल करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
येत्या आठ दिवसात कचऱयाची उचल करण्यात आली नाहीतर जिल्हा पंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनात ग्रा. पं. सदस्य रवि कोटबागी, ग्रा. पं. सदस्या मीरा देशपांडेंसह रमेश देशपांडे, अरुण तीप्पानावर, श्रीशैल कुलकर्णी, आकाश शेट्टी, बसवराज हुडकलकट्टी, संतोष सुतारसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









