प्रवाशांची लूट सुरुच : आरटीओ विभागाचा निष्क्रियपणा कारणीभूत, नागरिकही तेवढेच जबाबदार
प्रतिनिधी /बेळगाव
मागील तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करुन शहराच्या तीन वेगवेगळय़ा भागात सुरू करण्यात आलेली प्रीपेड ऑटोरिक्षा केंदे सुरू करण्यात आली. सुरुवातीला काही महिने ती चालली. मात्र नंतर ती कुचकामी ठरली आहेत. शहरात मीटर प्रमाणे भाडे आकारणी होत नाही. अशात प्रीपेड केंद्रांवर प्रवासी जाऊन पोहोचत नाहीत. यामुळे या केंद्रांची अवस्था बिकट बनली असून, आरटीओ विभागाचा निष्क्रिय कारभार त्याला कारणीभूत ठरला आहे. याचबरोबर नागरिकांचे असहकार्यही तितकेच याला कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे ही तिन्ही प्रीपेट रिक्षा स्टेशन केवळ फार्सच ठरले आहे.
बेळगावात सर्वप्रथम रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटोरिक्षा स्थानक सुरू करण्यात आले. याची कार्यवाही जेमतेम असताना ती सुधारण्याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि हॉटेल रामदेव अशा दोन ठिकाणी प्रीपेड ऑटोरिक्षा स्थानकांची उभारणी प्रशासनाने केली आहे. मात्र त्यापैकी एकही स्थानक सध्या सुरू नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या योजनेला रिक्षाचालकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हा प्रश्नच होता.
मनमानी कारभाराचा नागरिकांना फटका
प्रीपेड स्थानके सुरू झाल्यास कि. मी. वर निर्धारित करण्यात आलेल्या दराने प्रवास भाडे स्वीकारावे लागते. दरम्यान या तिन्ही ठिकाणी या स्थानकांवर प्रवासी पोहोचूच नयेत, अशी व्यवस्था रिक्षा चालकांनी केल्यामुळे त्यांचे अस्तित्व झाकोळून गेले आहे. बेळगाव शहरात ऑटोरिक्षा भाडे आकारणीच्या बाबतीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा फटका सर्वच नागरिकांना बसत आहे. यामुळे ठिकठिकाणी
प्रीपेड ऑटोरिक्षा स्थानक उभे करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. ती सुरूही करण्यात आली. मात्र कालांतराने ती बंद पडल्याचे सामोरे आले आहे.
प्रीपेड केंद्रावर नियंत्रण ठेवण्यात अपयश
प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती बसस्थानक आणि रामदेवनजीक प्रीपेड स्थानके सुरू झाली. मध्यवर्ती बस स्थानकाचे काम सुरू झाल्यामुळे तेथील स्थानक हटले गेले आहे. रामदेवनजीक प्रीपेड स्थानक एकही दिवस चालू शकलेले नाही. तर सर्वात जुन्या रेल्वे स्थानकावरील प्रीपेड केंद्रावर कोणतीच कार्यवाही होत नाही. या प्रकारावर योग्य नियंत्रण ठेवण्यात आरटीओ प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. याकडे नागरिकांनीही तेवढेच दुर्लक्ष केले आहे. प्रीपेड रिक्षा चालक सुरू करण्यासाठी आता पुन्हा प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र याकडे आता कोण लक्ष देणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
यापुढे नागरिकांनी दर निश्चिती करावी
ही स्थानके सुरू करताना या पुढील काळात रिक्षा प्रवास करताना नागरिकांनी दर निश्चिती करून तसेच पहिल्यांदा भाडे जमा करून रिक्षा सेवा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र नागरिकांचेही उदासिन धोरण याबाबतीत तितकेच कारणीभूत ठरले आहे. प्रीपेड ऑटोरिक्षा स्थानक रिक्षाचालकांना त्रासदायक ठरेल, अशी भूमिका मांडत रिक्षा संघटनांनी आपला विरोधी सूर कायम ठेवला आहे. मात्र आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत
आहे.
नागरिकांच्या प्रतिसादाची गरज
शहरातील तिन्ही प्रीपेड रिक्षा स्थानक सुरू झाले होते. त्यावेळी काही प्रमाणात रिक्षा चालकांनी याला सहकार्य केले. मात्र नागरिकांच्या उदासिनतेमुळे ती बंद पडली आहेत. आता परत यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मात्र याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास ती यशस्वीपणे चालतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– आरटीओ शिवानंद मगदूम









