गोवा कॅनचा फोंडा उपजिल्हाधिकाऱयांसमोर प्रस्ताव
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यात बुडून मृत्यू होण्याच्या वाढत्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी ‘रोड मॅप’ म्हणजेच ठोस कृती कार्यक्रम आखण्याचा प्रस्ताव गोवा कॅन या बिगर सरकारी संस्थेने फोंडा उपजिल्हाधिकाऱयांसमोर मांडला आहे. त्यासाठी दूधसागर व खांडेपार नदीतील धोकादायक स्थळांबरोबरच, तालुक्यातील बागायतीमधील पाणी पुरवठय़ाच्या टाक्या, खुल्या चिरेखाणी व धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याची मागणी मंगळवारी झालेल्या बैठकीत गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी केली आहे.
उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या बैठकीला तालुक्यातील विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱयांची उपस्थिती होती. बुडीत मृत्यू दुर्घटनांना आळा घालण्यासाठी सूचना व चर्चा करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी ओकांब धारबांदोडा येथे दूधसागर नदीत एक युवक बुडाल्याने तसेच दोन महिन्यापूर्वी करमळे-केरी येथे कुळगारातील पाण्याच्या टाकीत दोघा कोवळय़ा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने अशा घटना यापुढे घडू नये, यासाठी गोवा कॅनने पाठपुरावा सुरु केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 25 जुलै हा जागतिक बुडीत मृत्यू प्रनिबंधक दिवस म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे हे प्रकार गांभीर्याने घेऊन येत्या 25 जुलैपर्यंत खांडेपार व दूधसागर नदीकाठच्या धोकादायक जागा, तालुक्यातील शेती बागायतीमधील पाण्याच्या टाक्या, मोकळय़ा चिरेखाणी तसेच गावातील खुल्या विहिरींचे सर्वेक्षण करुन अशा दुर्घटना कशा प्रकारे रोखता येईल, यासाठी कृतीकार्यक्रम आखला जावा, अशी मागणी गोवा कॅनतर्फे करण्यात आली आहे. धोकादायक स्थळांवर सतर्कतेचे फलक उभारतानाच प्रतिबंधक उपाययोजना म्हणून कुंपणाची व्यवस्था व इतर उपाय बैठकीत सुचविण्यात आले. तसेच एखादी घटना घडल्यास प्रथमोपचार देणारे वैद्यकीय पथक, मदत कार्यासाठी धावणाऱया आपत्कालीन यंत्रणांचे संपर्क क्रमांक सतर्कता फलकावर लावणे या अन्य उपायांवरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला मामलेदार श्री. दलाल, फोंडा अग्नीशामक दलाचे स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर, जलसंवर्धन खात्याचे साहाय्यक अभियंते श्री. करमल, पोलीस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, कृषी खात्याचे अधिकारी ओंकार देसाई, गटविकास कार्यालयाचे धाकलू घाडी, पशुसंवर्धन खात्याचे डॉ. एम. जी. उमर्ये हे उपस्थित होते.









