प्रतिनिधी /म्हापसा
‘मी होणार सुपर स्टार आवाज कुणाचा… महाराष्ट्राचा’ या स्टार प्रवाह वरील कार्यक्रमास 14 मे पासून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात गोव्याचा एक संघ गेला असून या कार्यक्रमात त्यांची निवड झालेली आहे. सनील पार्सेकर, दत्तराज च्यारी, वरद भट, आकाश गांवकर, यशवंत नाईक आणि दत्तराज कोलवाळकर अशी स्पर्धकांची नावे असून त्यांच्या संघाचे नाव ‘जिग्यासा’ असे आहे. प्रा. स्व. मयुरेश वस्त या गोवा संगीत महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या निरिक्षणाखाली एका विशिष्ट संगीत शैलीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते व सध्या ते स्वतंत्रपणे याचा सराव करून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
डॉ. सलील कुलकर्णी, बेला शेंडे व आदर्श शिंदे या कार्यक्रमाचे परिक्षक असून पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालन करीत आहेत. ‘मी होणार सुपर स्टार’ ‘आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर शनिवार, रविवार रात्री 9 वा. प्रदर्शित होणार आहे.









