वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी येथे सुरू असलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये सेनादलाचा मल्ल सतेंदर मलिकने पंच जगबीर सिंग यांच्यावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने शिस्तभंगाची कारवाई म्हणून सतेंदर मलिकवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
या चाचणी स्पर्धेत 125 किलो वजनगटातील अंतिम लढतीत मल्ल सतेंदर मलिकने 18 सेकंद बाकी असेपर्यंत प्रतिस्पर्धी मल्ल मोहीतवर 3-0 अशा गुणांनी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर मोहीतने सतेंदर मलिकला खाली घेत गुण मिळविला. पंच वीरेंद्र मलिक यांनी मोहितला दोन गुण बहाल न करता केवळ एक गुण दिला. या निर्णयामुळे मोहीत निराश झाला. या लढतीसाठी नियुक्त करण्यात आलेले पंच सत्यदेव मलिक यांनी सतेंदर मलिकला दोन गुण देण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पंच जगबीर सिंग यांनी टीव्ही रिप्लेचा आधार घेत मोहितला 3 गुण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. दोन्ही मल्ल 3-3 असे लढतीच्या अखेरीपर्यंत बरोबरीत होते. पण मोहीतने या लढतीच्या शेवटच्याक्षणी शेवटचा गुण मिळविल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले. या निर्णयानंतर सतेंदर मलिकने पंच जगबीर सिंग यांच्यावर हल्ला केला. सुरूवातीला सतेंदर मलिकने जगबीर सिंग यांना शिवीगाळ केली, त्यानंतर त्यांच्या थोबाडात मारली. जगबीर सिंग या हल्ल्यामुळे अचानक खाली कोसळले. या घटनेबद्दल उपस्थित अनेक शौकिनांनी नाराजी व्यक्त केली.









