22 वर्षीय टीव्ही मालिकेतील अभिनेत्रीचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
फॅट फ्री सर्जरी अभिनेत्रीच्या जीवावर बेतल्याची घटना बेंगळुरात घडली आहे. या घटनेला खासगी इस्पितळातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा ठपका अभिनेत्रीच्या पालकांनी ठेवला आहे. चेतना राज (वय 22) असे या टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱया अभिनेत्रीचे नाव आहे. सर्जरीनंतर तिचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
बेंगळूरच्या राजाजीनगर येथील एका सौंदर्यवर्धक चिकित्सालयामध्ये सोमवारी फॅटमुक्त कॉस्मेटीक सर्जरीनंतर चेतना राजचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी त्या क्लिनिकविरुद्ध सुब्रह्मण्यनगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. संशयास्पद मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
सर्जरीनंतर सायंकाळी चेतनाला अस्वस्थता जाणवू लागली. तिच्या फुप्फुसांमध्ये पाणी साठत असल्याचे दिसून आल्यानंतर तिची प्रकृती आणखी ढासळली. तिने सर्जरीविषयी पालकांना माहिती दिली नव्हती. आपल्या मित्रांसोबत क्लिनिकमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी चेतनाच्या पालकांची परवानगी घेतली नव्हती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला असून क्लिनिकचे मालक डॉ. साहेबगौडा शेट्टी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चेतनाच्या पालकांनी केली आहे.
अभिनेत्री चेतना राज ही बेंगळूरच्या चिक्कबाणवार येथील रहिवासी असून कन्नडमधील गीता, दोरेसानी या मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे वडील वरदराजू हे उद्योजक आहेत. शुक्रवारी सकाळी आपली मुलगी क्लिनिकमध्ये आली होती. तिला डॉक्टरांनी फॅट कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, दुसऱया क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेसाठी स्थलांतर केले नाही, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.









