डिचोली/प्रतिनिधी
गेल्या शुक्र. दि. 13 रोजी वाठादेव सर्वण येथे एका बिहारी महिलेचा उघडकीस आलेल्या खुनाचा छडा लावण्याच्या दृष्टीने डिचोली पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतीमान करून फरारी असलेल्या पतीला ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. खूनास बळी पडलेल्या महिलेचे नाव शोभादेवी बळीराम कुमार महातो असे असून सध्या ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव बळीराम अनंत कुमार महातो असे आहे.
सदर घटना शुक्र. दि. 13 रोजी उघडकीस आली होती. वाठादेव सर्वण येथील हसन मामलेकर यांच्या मालकीच्या भाडय़ाच्या खोलीमध्ये राहत असलेल्या सदर बळीराम कुमार महातो हा आपल्या तीन वषीय मुलीला घेऊन गुरू. दि. 12 मे रोजी सकाळी 6.30 वा. बाहेर पडला असता शेजारीच राहणाऱया एका महिलेने त्याला हटकले होते. तेव्हा आपण फिरायला जात असल्याचे सांगत तो तीन वषीय मुलीला घेऊन निघाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेजारीच खोलीमध्ये राहणाऱया एका मुलाने बळीरामच्या खोलीमध्ये मांजर मोठमोठय़ाने ओरडत असल्याने कडीच्या छीद्रातून पाहिले असता महिलेचा मृतदेह दृष्टीस पडला होता. याची माहिती तेथे इतरांना सांगितल्यानंतर एका इसमाने छीद्रातून खोलीत पाहिले व खातरजमा करून पोलिसांना कळविले होते.
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कुलूप तोडून खोली उघडली असता आत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदर दांपत्याला खोलीत भाडय़ाने ठेवताना खोलीमालकाने त्यांची कोणतीही माहिती न घेतल्याने तसेच भाडेकरूंचा टेनंट अर्ज न भरल्याने पोलिसांना सदर महिलेचे नाव सुध्दा मिळाले नव्हते. तर सदर बळीराम हा कामाला असलेल्या ठिकाणाहून त्याचे नाव समजले होते. त्याचा साधा फोटोही नव्हता. तर एका सिसीटिव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या त्याच्या छबीवरून त्याला ताब्यात घेण्यासाठी डिचोली पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली.
संशयित बळीराम कुमार महातो हा खोली बंद करून आपल्या मुलीसह थिवी रेल्वे स्थानकावरून मंगला एक्स्प्रेस या रेल्वेतून उत्तर प्रदेश येथे जाण्यास निघाला होता. या प्रवासात त्याने वापरलेल्या आपल्या मोबाईलच्या लोकेशनचा ठाव घेत पोलिसांनी तो झांसी येथे तो असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डिचोली पोलीस उपअधिक्षक सागर एकोसकर व निरिक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिसांचे एक पथक झांसी येथे जाण्यास निघाले. झांसी येथे विरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावरून बिहार येथे जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले. या कामात या पोलिसांच्या पथकाने झांसी येथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली.
संशयित बळीराम याला आणण्यासाठी गेलेल्या डिचोली पोलिसांच्या पथकात उपनिरीक्षक अनिल पोलेकर, हवालदार विजय मांदेकर, पोलीस कोन्स्ट?बल रणजीत बाले यांचा समावेश होता. बळीराम याला डिचोली पोलीस स्थानकावर काल सोम. दि. 16 मे रोजी संध्या. 5 वा. च्या सुमारास आणण्यात आले. त्यानंतर त्याची चौकशी करून अटक करण्यात आली.
अटक केलेल्या बळीराम याला आज मंगळ. दि. 17 मे रोजी पोलीस रिमांडसाठी न्यायालयात सादर केला जाणार आहे. पत्नीच्या खुनाची माहिती मिळविण्यासाठी त्याची कसून पोलीस चौकशी केली जाणार असून खुनाची कबुली व खुनाचे कारण स्पष्ट करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुरज गावस अधिक तपास करीत आहे.









