ऑनलाईन टीम / मुंबई :
गोरेगावाच्या नेस्को मैदानावरील हिंदी भाषी महासंकल्प सभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईची किती वाट लागली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजना व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात ठप्प झाले आहेत. परिणामी मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबईला शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल, अशी मुंबई तयार करायची आहे. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत लंका दहन होणार, मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार, असा निर्धार फडणवीस यांनी हिंदी भाषी महासंकल्प सभेत व्यक्त केला होता.
तसेच महाविकास आघाडी सरकारचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शिवसेना कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. मुंबईचा बाप शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असं संजय राऊत यांनी शनिवारी म्हटलं होतं.








