नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कोल्हापूर प्रतिनिधी
राजोपाध्येनगर परिसरातील बिडी कामगार कॉलनी येथे पिण्याच्या पाईपलाईनमधून गेल्या काही दिवसापूर्वी अळी आढळून आली होती. आता परिसरातील अनेक घरामध्ये गढूळ, तेलकट तवंग तसेच दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. एका घरात तर चक्क दुधासारखे पांढरे पाणी आले. याबाबत वारंवार तक्रार देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुळातच या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. येथील काहींनी इलेक्ट्रीक मोटारी जोडल्याचे नागरिक सांगत आहेत. मोटर जोडल्यामुळे याचा पुढील पाणी पुरवठय़ावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा नळधारकांची तपासणी करणे गरजेचे आहे. रात्री उशीरा पाणीपुरवठा होत असल्याने रात्रभर पाण्यासाठी जागावे लागते. त्यातच नळाला दुर्गंधीयुक्त आणि अळ्यामिश्रित पाणी येत असल्याने येथील नागरकि संतप्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे.
मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
बिडी कॉलनीत 214 घरापैकी सुमारे 50 घरांमध्ये दुषित पाणीपुरवठा होत आहे. अळ्यामिश्रित, दुर्गंधीयुक्त, तेलकट तवंग असणाऱया या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठय़ाकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे येथील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली.
जुन्या पाईपलाईनमुळे दुषित पाणीपुरवठा
बिडी कॉलनीमधील पाईपलाईन 30 वर्षापूर्वीच्या असल्याने त्या पूर्ण खराब झाल्या आहेत. त्यातूनच ड्रेनेजचे व गटारचे पाणी मिसळून पाण्याला दुर्गंधी सुटत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
रेहाना नागरकट्टी, बिडी कॉलनी रहिवासी