अध्याय सोळावा
भगवंत म्हणाले, उद्धवा ! मी सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या. वास्तविक या काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिक दृष्टय़ा खरी नसते. थोडक्मयात मी ज्या विभूती सांगितल्या त्या अनुभवरूपानेच जाणल्या पाहिजेत. वस्तुतः माझे स्वरूप अद्वैत आहे. मला नाम नाही, रूप नाही, गुण नाही व वर्णही नाही. तेव्हा नाना प्रकारच्या विभूतीचे लक्षण सांगावयाचे म्हटले तर ते मिथ्या शाब्दीकच समजावे. म्हणून तू वाणी, मन प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्त्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या, जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. माझं स्वरूप नित्य निर्विकार असल्यामुळे मनाला, बुद्धीला किंवा वाचेलाही त्याचा पार लागत नाही. मग इंद्रिये तर काय बिचारी पामर ! प्राणालाही या स्वरूपाचा निर्धार कळणे शक्मय नाही. याकरिता शमदम अशा अनुक्रमाने मन, बुद्धी, वाणी व इंद्रिये यांचे नियमन कर आणि प्राणधर्माप्रमाणे प्राणाचेही नियमन कर म्हणजे आत्मस्वरूपाला पोचशील. आता मन, बुद्धी, वाचा इंद्रियांदिकाचे नियमन करण्याचे वर्म कळत नाही असे म्हणशील तर त्याचाही अनुक्रम सुलभ रीतीने सांगतो ऐक. वाणीचे नियमन माझ्या नामाने करावे, मनाचे नियमन ध्यानसामर्थ्यानं करावे, प्राणाचे नियमन प्राणायामने करावे आणि इंद्रियांचे नियमन दमाने म्हणजे संयमाने करावे. बुद्धीचे नियमन आत्मविचाराने करावे, जीवाचे नियमन परमात्मसुखाने करावे. इतके केलेस की, तू हटकून मत्स्वरूप होशील. वाणी, मन, इंद्रिये, बुद्धी आणि जीव हे सर्व मायेमुळे निर्माण होतात म्हणून प्रथम माझ्या नामस्मरणात वाणीला गुंतवावे म्हणजे मन, इंद्रिये, बुद्धी आणि जीव आपोआप वश होतील. एकदा नामस्मरण सुरू होऊन मन त्यात गुंतले की, मनात येणारे निरनिराळे विचार व त्याला अनुरूप संकल्पविकल्प आपोआपच थांबतील. विचार थांबले की, बुद्धीला काही खाद्य मिळणार नाही तसेच इंद्रियांच्या हालचालींनाही लगाम बसेल. त्यामुळे जीवही मी कर्ता आहे या समजातून बाहेर पडेल. एकदा मत्स्वरूप झालास की, मग संसारच दृष्टीला पडणार नाही. जन्ममरणाच्या गोष्टी बंद पडतील व येण्याजाण्याची यातायात संपेल. मी सांगितलेल्या नियमपद्धतीनुसार नियमन करण्याचे ज्याच्या मनात भरत नाही, तो कोटय़वधी दुःखे भोगतो, त्याचेही वर्णन सांगतो, ऐक. जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही, त्याचे व्रत, तप आणि ज्ञान कच्च्या घडय़ात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसे होते. म्हणून भक्ताने मत्परायण होऊन, भक्तीयुक्त बुद्धीने, मन, वाणी आणि प्राणांचा संयम करावा असे केल्याने तो कृतकृत्य होतो. अशा प्रकारे सावधान वृत्तीने जो माझे भजन करतो त्याच्या विषयवासना जळून जातात, आणि निर्विकल्प अशी शांती उत्पन्न होते.
भक्तीमार्गाने चालू लागले असता सर्व साधने लाजून जातात. भक्तीसाठीच मी लक्ष्मीपती प्रगट होऊन माझ्या भक्तांच्या संसाराची निवृत्ती करून टाकतो. कारण माझ्या भक्ताला जर संसाराची बाधा होईल, तर त्याची लाज मलाच असते. म्हणून मी माझ्या भक्तांची गांजणूक होऊ देत नाही. प्रल्हादाचा छळ होऊ लागताच मी नरसिंहरूपाने कोरडय़ा का÷ामध्ये प्रगट झालो आणि गजेंद्रासाठी वैकुंठ सोडून त्वरेने धावत आलो. कौरव द्रौपदीचा छळ करीत असताना मी तात्काळ कौरवांची तोंडे काळी करून सोडली. वणव्याने गोपाळांना पीडा दिली त्यावेळी तो दावाग्नी मी पिऊनच टाकिला ! इंद्र गोकुळाला त्रास देत असता मी हातावर गोवर्धन पर्वत उचलून धरला. तसेच गोपिकांचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मी श्रीपती कामी बनलो.
अर्जुनाच्या प्रतिज्ञेचे पालन होण्यासाठी मी दिवसाच सूर्याला लपवून ठेवले आणि जयद्रथाला मारविण्याचा पराक्रम करून अर्जुनाला वाचविले. अंबरीषाचा गर्भवास मी आनंदाने सोसला. मी श्रीकृष्ण आपल्या भक्तांकडे कधीही कमीपणा येऊ देत नाही.
क्रमशः







