वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे दीमा हसाओच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. असानी चक्रीवादळानंतर आसाममध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हजारो लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार पावसामुळे दीमा हसाओ जिल्हय़ामधील 12 गावांमध्ये भूस्खलनाचा प्रकार घडला आहे. हाफलोंग भागात सुमारे 80 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका महिलेसह तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. सैन्याने बालिचरा आणि बरखोला येथील पूरग्रस्त भागांमध्ये बचाव मोहीम राबविली आहे. तर होजईमध्ये पूरामुळे रस्ते, पूल आणि शेती पाण्याखाली गेली आहे.

दीमा हसाओमध्ये पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असून अनेक इमारतींना नुकसान पोहोचले आहे. हाफलोंग भागात अतिवृष्टीमुळे रस्तेच वाहून गेले आहेत. कछार, धेमाजी, होजई, कार्बी आंगलोंग पश्चिम, नागांव आणि कामरुप या जिल्ह्य़ांमधील 94 गावांना पूराचा तडाखा बसला आहे. पूरामळे माईबांग आणि माहूर दरम्यानचा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेला आहे. याचबरोबर पूरसंकटामुळे अनेक रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 15 मेपर्यंत आसामच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. हवामान विभागानुसार आसाम, मेघालय तसेच अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.









