जत/प्रतिनिधी
जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तालुक्यातील विविध विकास कामासाठी 2 कोटी 10 लाखांच्या निधीची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जत येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले आले असता त्यांची भेट घेत आमदार सावंत यांनी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली.
आ. सावंत म्हणाले, तालुका विस्ताराने मोठा व कायम स्वरूपी दुष्काळी आहे.महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय कडून येणारा निधी येतो, पण जत तालुका सर्वात विस्ताराने व मोठा असल्याने आलेला निधी हा कमी पडत आहे. तरी आपल्या विभागाकडून तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करावा. आमदार सावंत यांनी बिळूर येथे बौद्ध विहार बांधणे 25 लाख रुपये, येळदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 20 लाख, वळसंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 20 लाख रुपये, उमराणी येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, माडग्याळ येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, बेळोंडगी येथे बौध्द विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण 40 लाख रुपये, संख येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी, वाचनालय, सामाजिक सभागृह व सुशोभिकरणासाठी 40 लाख रुपये निधीची मागणी केली.
यावेळी माजी महापौर विवेक कांबळे, संजयराव कांबळे, बाबासाहेब कोडग, रावसाहेब मंगसुळी, बाळासाहेब तंगडी, सइसाब नदाफ, आप्पू माळी आदी उपस्थित होते.