रोहित शर्मा, विराट, पंत, केएल राहुल, बुमराहला विश्रांती मिळणार, 22 मे रोजी संघनिवडीची बैठक शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुलसह अनेक अनुभवी खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 5 सामन्यांच्या आगामी टी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार असून कर्णधारपदासाठी शिखर धवन व हार्दिक पंडय़ा ठळक चर्चेत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विराट कोहली, जसप्रित बुमराह, रिषभ पंत यांनाही विश्रांती दिली जाणे अपेक्षित आहे.
अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या हाताळत असलेल्या हार्दिक पंडय़ा यांच्यापैकी एकाची कर्णधारपदी निवड होण्याची शक्यता आहे. भारत-द. आफ्रिका यांच्यातील पहिली टी-20 दि. 9 जून नवी दिल्लीत होणार असून उर्वरित 4 लढती अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट व बेंगळूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी दि. 22 मे रोजी संघनिवड केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 व आयर्लंडविरुद्ध 2 असे 7 टी-20 सामने खेळणार असून या सर्वही लढतीत सदर वरिष्ठ खेळाडूंचा समावेश नसेल. हे सर्व खेळाडू इंग्लंडविरुद्ध प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होणे अपेक्षित आहे. सूर्यकुमार यादव व रविंद्र जडेजा यांच्या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट होणे बाकी असून मोहसिन खान, उमरान मलिक हे संघाचे दरवाजे ठोठावत असणार आहेत.