संचालिका शौमिका महाडिक यांचा सवाल; दहा प्रश्नांची उत्तरे देण्याचे सतेज पाटील यांना आव्हान
प्रतिनिधी/ कोल्हापूर
गोकुळ दूध संघाबाबत मुद्यांना धरुन रितसर प्रश्न उपस्थित केले, तर ती संघाची बदनामी होते, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना वाटते. मग गेली दहा वर्ष पालकमंत्री सतेज पाटील गोकुळच्या कार्यपद्धतीवर पातळी सोडून निरर्थक टिका करत होते, तेंव्हा पालकमंत्री गोकुळच्या लौकीकात भर टाकण्याचे काम करत होते का? असा प्रश्न गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला. तसेच राजकारणासाठी काहीही बोलणे योग्य नाही, हाच सल्ला त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांना पालकमंत्री सतेज पाटील यांना द्यावा, असे का वाटले नाही, अशा शब्दात संचालिका महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री पाटील यांचा समाचार घेतला.
गोकुळमधील सत्तास्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी संचालिका महाडिक यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून राजकारणासाठी काहीही बोलणे योग्य नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संचालिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकातून समाचार घेतला आहे. तसेच पत्रकामध्ये उपस्थित केलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हानही त्यांनी दोन्ही मंत्र्यांना दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, पालकमंत्री सतेज पाटील 2017 साली सातत्याने ग्राहकांवर दरवाढ लादून खरेदी दर का वाढवले, असा प्रश्न उपस्थित करत होते. मग आत्ता तुम्ही ग्राहकांवर दरवाढ न लादता शेतकऱयांना का दरवाढ दिली नाही. खरेदी दरात वाढ केल्यावर पुणे-मुंबई त्यानंतर इतर विभाग आणि उत्तरच्या पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूरमध्ये दरवाढ केली. विक्री दरात किती वाढ केली आणि मोबदला म्हणून शेतकऱयांना किती रुपये दिले, हे स्पष्ट करण्याचे आव्हान संचालिका महाडिक यांनी केले आहे. तसेच एकीकडे आम्ही वचनपूर्ती केली असे पालकमंत्री म्हणत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांवर भार टाकला, असेही सत्ताधारी सांगत आहेत, त्यामुळे सत्ताधाऱयांना आपण नेमकं काय वचन दिल होते, याच भान नसल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे.
गोकुळ घशात घालण्याचा नियोजन
माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळवर 25 वर्ष सत्ता होती. पण त्यांनी दूध संस्थांबाबत कधीच सुडबुद्धी ठेवली नाही. मात्र सध्याच्या सत्ताकाळात वर्षभरात जिल्हय़ात किती नवीन दूध संस्थांना मंजुरी मिळाली. यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वाधीक नव्या संस्था झाल्या. मग या नव्या दूध संस्थांच्या माध्यमातून दूध संकलन किती वाढले. याच उत्तरही पालकमंत्री यांनी द्यावे, आपल्या मर्जीतील तालुक्यांमध्ये दूध संस्थांची संख्या वाढवून पाच वर्षात संघ घशात घालण्याचे पालकमंत्र्यांचे नियोजन असल्याचा गंभीर आरोपही महाडिक यांनी केली आहे.
ठेका बदलताच वाहतुकीचे दर कसे वाढले
टँकरच्या वाहतुकीत 5 कोटींची बचत केल्याचे सांगितले जात आहे. जुने ठेकेदार कमी दरात वाहतूक करत होते, त्यामुळे हे शक्य झाले. मात्र जुने ठेके बदलताच नवीन ठेका देताना वाहतुकीचे दर कसे वाढले. वाहतुक ठेक्याचे जुने आणि नवीन दर किती आहेत. नवीन ठेक्यांमध्ये कोणाच्या मालकीचे किती टँकर आहेत, याचीही स्पष्टोक्ती सत्ताधाऱयांनी द्यावी, अशी मागणी संचालिक महाडिक यांनी केली आहे. तसेच वासाचे दूध कमी झाल्याचे सांगताय तर मागील 3 वर्षांची वासाच्या दुधाची तुलनात्मक माहिती जाहीर करण्याचे आवाहनही केले आहे.
कर्नाटक, परजिल्हय़ातील दूधामुळे गुणवत्तेवर परिणाम
उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आणि इतर वैयक्तिक लाभ मिळवायच्या पायात परजिल्हे आणि कर्नाटक येथून किती संकलन वाढले याची आकडेवारी जाहीर करा. या दुधामुळे गोकुळच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे का, याचीही स्पष्टोक्ती द्या. यामुळे दूध संकलन वाढ म्हणजे नेमके काय सुरु आहे आणि त्याच्या गोकुळच्या गुणवत्तेवर काय परिणाम होत आहे, हे जनते समोर येईल, असे महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.