पालकमंत्री सतेज पाटील : सत्तास्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त घेतला आढावा : गोकुळला अमूलच्या बरोबरीला आणणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
दर्जेदार दुधामुळे गोकुळचा बँड तयार झाला आहे. कोल्हापुरचा हा बँण्ड पुढील काळात पश्चिम महाराष्ट्राचा बँड करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच पुणे, सोलापूर, सांगली, सातारा जिल्हय़ातील दूध संघांना गोकुळच्या छताखाली आणत संकलन वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्हय़ातील संकलनही एक लाख लिटरवर नेण्याचे नियोजन करणार आहे. यामाध्यमातून गोकुळचा पश्चिम महाराष्ट्रात एकमुखी सन्मान करण्याचा प्रयत्न आमचा राहणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळमधील सत्तास्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी चेअरमन विश्वास पाटील यांनी यांनी वर्षभरात गोकुळ दूध संकलन आणि व्रिक्रीत झालेल्या वाढी संदर्भात माहिती दिली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गेल्या वर्षाभरत शेतकऱयांना केंद्रबिदू ठेवून गोकुळच्या संचालक मंडळाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. तसेच या काळात दूध उत्पादक शेतकऱयांचा गोकुळवरील विश्वास अधिक दृढ झाल्याने वर्षभरात संकलनामध्ये 5 कोटी 33 लाख लिटरची वाढ झाली आहे. शेतकऱयांना म्हैस दूध खरेदी दरात 4 रुपयांची तर गाय दूधात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ देण्यात आली. तसेच काटकसरीचे विविध निर्णय घेत खर्चामध्ये 10 कोटी रुपयांची बचत केल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
20 लाख लिटर संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करणार
गोकुळचे 20 लाख लिटरच दुध संकलनाचे उद्दीष्ट या सत्ताकाळात पूर्ण करायचे आहे. यासाठी अधिकारी, सुपरवायझर यांच्याशी वारंवार बैठका घेवून हे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे नियोजन करणार आहे. कोल्हापूरसह कर्नाटक, सांगली, सातारा या जिल्हय़ातूनही संकलन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्हय़ातील प्रतिदिन 30 ते 40 हजारच्या आसपास असणारे संकलन 1 लाख लिटरवर घेवून जाण्याच्या दृष्टीने नियोजन करणार आहे. यासाठी तेथील जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱयांना दूध उत्पन्न वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुढील 25 वर्षांच्या विचारातून मुंबईत विस्तार
मुंबईमध्ये गोकुळ दूधाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे पुढील 25 वर्षांचा विचार करुन खोपोली येथे गोकुळच्या प्रकल्पासाठी जागा खरेदी केली. लवकरच येथे प्लांटचे विस्तारीकरण करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठ काबीज करणार
मागील सत्ताकाळात दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीकडे दूर्लक्ष झाले. मात्र आता पुढील काळात दूधा प्रमाणे दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठही काबीज करण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबई, पुणे येथे दुग्धजन्य पदार्थांच्या मार्केटींगवरही भर देणार आहे. मार्केटींग एजन्सीजची नेमणूक करुन येथे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ करणार आहे. गाय दुधालाही मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. यामाध्यमातून पुढील काळात गोकुळची अमूलला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
गोकुळ, जिल्हा बँक विकासाचा चेहरा
गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँक कोल्हापुरच्या विकासाचा चेहरा आहेत. त्यांच्यामाध्यामातून शेतकऱयांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. शेतकऱयांच्या विकास झाल्यास अन्य घटकांचाही आपसुकच विकास होतो. त्यामुळे जिल्हय़ाच्या विकासाचा चेहरा असणाऱया या प्रमुख संस्था टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.