बेंगळूरच्या न्यायालयाचा दणका
प्रतिनिधी / बेळगाव
न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले. शेतकऱयांनी विरोध केला असतानाही न्यायालयाचा अवमान करत हे काम सुरू केल्यामुळे शेतकऱयांच्या वकिलांनी बेंगळूर येथील खंडपीठाकडे धाव घेतली. त्याठिकाणी बाजू मांडली असता न्यायालयाने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रांताधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याबाबत येथील आठवे दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शेतकऱयांच्या शेतामध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या पिकालाही हात लावू नये, असा आदेश दिला आहे. असे असताना अचानकपणे गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू केले. त्यामुळे शेतकरी पुन्हा तणावाखाली आले आहेत.
स्थगिती असताना काम करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे वकील रविकुमार गोकाककर यांनी बेंगळूर येथील न्यायालयामध्ये धाव घेतली. त्याठिकाणी शेतकऱयांची बाजू मांडली आहे. त्यामुळे न्यायालयाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून 25 तारखेला त्याचे स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा शेतकऱयांना मिळाला आहे.









