बेळगाव शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश : रुंदीकरण केल्यास पुराचा धोका होणार कमी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील सांडपाणी वाहून नेणारा लेंडी नाला हिंद इंजिनिअरिंगपासून अरुंद झाला होता. तसेच त्यामध्ये गाळही मोठय़ा प्रमाणात साचला होता. त्यामुळे शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत आहे. तसेच शेतकऱयांच्या पिकांचेही नुकसान होत होते. त्यामुळे बेळगाव शेतकरी संघटनेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी वारंवार केली. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून या नाल्याची स्वच्छता करण्याचे काम सुरू झाले आहे. गुरुवारपासून या नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शहरातील सांडपाणी वाहणारा हा सर्वात मोठा नाला आहे. हा नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो. मात्र या नाल्यात कचरा साचून पाण्याचा निचरा होणेदेखील कठीण झाले होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत आहे. लेंडी नाल्याची साफसफाई व रुंदीकरण केल्यास निश्चितच पुराचा धोका कमी होऊ शकतो. याचबरोबर परिसरात असणाऱया जमिनीचेदेखील नुकसान टाळू शकतो, हे शेतकरी संघटनेला समजले. त्यानंतर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव यांनी या नाल्याच्या साफसफाईसाठी पाठपुरावा केला.
महापालिका तसेच आमदार अनिल बेनके यांनी तातडीने या नाल्याची साफसफाई मोहीम हाती घेतली. त्यानंतर आता हा नाला काही प्रमाणात रुंद करून तसेच झाडेझुडपे काढून पाणी पुढे जाण्यास वाट करून देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱयांनीही या कामाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.