ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
झारखंड सरकारने राज्य खाण सचिव पूजा सिंघल यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करून पाच दिवसांच्या कोठडीत पाठवल्यानंतर निलंबित केले आहे. झारखंड राज्याच्या कार्मिक विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि ‘राजभाषा’ विभागाने सिंघल यांच्या निलंबनासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 अंतर्गत नोटीस जारी केली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी सांगितले की सिंघल यांच्या अटकेनंतर त्यांचे सरकार सर्व ‘संभाव्य कायदेशीर कारवाई’ करेल. खुंटी जिल्ह्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) निधीच्या कथित अपहाराप्रकरणी केंद्रीय एजन्सीने सिंघल यांना अटक केली होती.
बुधवारी ताब्यात घेण्यापूर्वी तिची दोन दिवस चौकशी करण्यात आली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारे तिचे पती अभिषेक झा यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीने मंगळवारी या जोडप्याची नऊ तास चौकशी केली असून बुधवारी झा यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले.
2000 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सिंघल यांना रांची येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात ईडीने 12 दिवसांची रिमांड मागितली आहे.
ईडीची चौकशी ही मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असून, झारखंड सरकारचे माजी कनिष्ठ अभियंता राम बिनोद प्रसाद सिन्हा यांना जून 2020 मध्ये ईडीने ताब्यात घेतले आहे.