संगमेश्वनगर, राणी चन्नम्मानगर, गजानन महाराजनगरमध्ये चोरी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. संगमेश्वरनगर, राणी चन्नम्मानगर येथे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून मोठय़ा प्रमाणात दागिने पळविण्यात आले असून गजानन महाराजनगर, टिळकवाडी येथे दोन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनांनी एकच खळबळ माजली आहे.
संगमेश्वरनगर येथील महम्मद फारुख यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी एक किलो सोन्याचे दागिने पळविल्याची माहिती मिळाली आहे. ते सध्या दुबईत आहेत. बेंगळूर येथे राहणाऱया त्यांच्या मुलांनी यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चोरीच्या या घटनेने तपास यंत्रणा चक्रावली आहे.
घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांनी तिजोरी फोडून मोठय़ा प्रमाणात दागिने पळविले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पुढील कारवाई सुरू होती. 26 एप्रिल रोजी महम्मद फारुख हे दुबईला गेले आहेत. घरात कोणी नव्हते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
झाडांना पाणी घालण्यासाठी माळी येतो. पाणी घालण्यासाठी मंगळवारी माळी आला, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असलेला पाहून त्याने महम्मद फारुख यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांची मुले बेंगळूरला असतात. बुधवारी ते बेळगावात दाखल झाले. रात्री यासंबंधीची फिर्याद दिली आहे.
चन्नम्मानगर येथे घरफोडी
दुसरी घटना चन्नम्मानगर येथील वसंत विहार कॉलनी परिसरात घडली आहे. रेबिका शरापिम या शिक्षिकेच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
रेबिका या पहिल्या मजल्यावर राहतात. खालच्या घराला कुलूप लावून रात्री पहिल्या मजल्यावर त्या झोपल्या होत्या. बुधवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास त्या खाली उतरल्या. त्यावेळी दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. तातडीने उद्यमबाग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चोरटय़ांची छबी कॅमेऱयात कैद

गजानन महाराजनगर, टिळकवाडी येथे दोन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरटय़ांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून घरमालकांना जाग येताच चौघा जणांनी पळ काढला आहे. टिळकवाडी पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. हातात अवजारे आणि पिशवी घेऊन चेहरा झाकलेले चार तरुण चोरीसाठी आले होते. एक घर फोडले व दुसऱया घरात प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला.









