अन्न-नागरी पुरवठा खात्याने मिळवून दिले रेशनकार्ड
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील कुप्पटगिरी येथील एका वृद्ध महिलेला जिवंत असतानाही मयत दाखवून तिचे रेशनकार्ड रद्द करण्याचा प्रताप खानापूर येथील अन्न व नागरी पुरवठा विभागाने केला होता. यासंदर्भात तरुण भारतमधून त्या वृद्ध महिलेला न्याय मिळावा यासाठी वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच कुप्पटगिरी येथील ग्रामपंचायत सदस्या पद्मश्री पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने सदर वृद्ध महिलेला अखेर न्याय मिळाला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी तातडीने दखल घेऊन त्या वृद्ध महिलेला स्वतःचे बीपीएल रेशनकार्ड परत मिळवून दिले. शिवाय मागील दोन-तीन महिन्यांचे राशनदेखील त्या महिलेला मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत.
कुप्पटगिरी येथील भाग्यश्री विष्णू पाटील (वय 70) या महिलेला मयत दाखवून गेल्या जानेवारी महिन्यात तिचे बीपीएल रेशन कार्ड रद्द करण्यात आले होते. त्यामुळे गावातील ग्रा.पं. सदस्या पद्मश्री पाटील यांनी सदर वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे पद्मश्री पाटील यांनी याबाबत दैनिक तरुण भारतमधून पाठपुरावा करून महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे लेखी तक्रार देऊन जिवंत वृद्धेवर झालेला अन्याय दूर करण्याची विनंती केली होती. याची अन्न व नागरी पुरवठा खात्याने गांभीर्याने दखल घेऊन वृद्ध महिलेला राशन कार्ड परत मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे त्या वृद्ध महिलेने गेल्या चार महिन्यांपासून राशनसाठी केलेला आटापिटा पाहता ती हतबल झाली होती. अखेर तिच्या हातात स्वतःचे रेशन कार्ड पुन्हा मिळताच त्या वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले. त्या आजीने ग्रामपंचायत सदस्य पद्मश्री पाटील तसेच तरुण भारतचेही आभार मानले.









