प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मंजूर झाला नसल्याने कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन देण्यात आली नाही. दोन महिन्यांपासून वेतन व पेन्शन थकीत असल्याने तातडीने देण्याची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांना आजी-माजी कर्मचारी तसेच विविध संघटनांच्यावतीने मंगळवारी देण्यात आले.
मार्च महिन्याचे निम्मे वेतन कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांना देण्यात आले आहे. मार्च महिन्याचे निम्मे आणि एप्रिल महिन्याचे संपूर्ण वेतन अद्याप देण्यात आले नाही. पगारावर उदरनिर्वाह करणाऱया कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन दोन महिन्यांपासून देण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स कर्मचाऱयांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱयांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱयांची वाढीव पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी निवृत्त कर्मचारी संघटनेचे सेपेटरी विठ्ठल पोळ यांच्यासह कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









