पोलंडमध्ये संतप्त लोकांनी चेहऱयावर फेकला रंग
वृत्तसंस्था / वॉर्सा
युक्रेन युद्धामुळे पोलंडमध्ये रशियाचे राजदूत सर्गेई एंड्रीव्ह यांना मोठय़ा फजितीला सामोरे जावे लागले आहे. सर्गेई हे वॉर्सा येथे दुसऱया महायुद्धादरम्यान मारले गेलेल्या सोव्हियत सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. यादरम्यान काही लोकांनी त्यांच्या चेहऱयावर लाल रंग फेकला आहे. परंतु रशियाच्या राजदूताने संयम दाखवत निदर्शकांना कुठलेच प्रत्युत्तर देणे टाळले.
युद्धग्रस्त युक्रेनला अमेरिका 40 अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. अमेरिकेच्या संसदेने या सहाय्याकरता अनुमती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 28 एप्रिल रोजी युक्रेनसाठी काँग्रेसकडून 33 अब्ज डॉलर्सच्या सैन्य मदतीची मागणी केली होती. बिडेन यांनी युक्रेनच्या मदतीसाठी ऐतिहासिक लेंड-लीज ऍक्टवर स्वाक्षरी केली आहे.
जपानने रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तीन, सेक्रेटरी कौन्सिलचे सदस्य राशिद नर्गलिएव्ह आणि रशियातील प्रसिद्ध उद्योजक गेन्नेडी टिमचेंको यांच्यावर बंदी घातली आहे. तसेच जपानने बंदी घालण्यात आलेल्या 70 रशियन कंपन्यांची यादी जाहीर केली आहे.
रशियाने सोमवारी ओडेशा शहरावर दोनवेळा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये एका नागरिकाला जीव गमवावा लागला असून 5 जण जखमी झाले आहेत. डोनेट्स्क आणि लुहान्स्कमध्ये युक्रेनच्या सैन्याने रशियाचे 9 रणगाडे आणि 3 तोफा नष्ट केल्या आहेत.
युएन महासचिवांचा मोल्दोवा दौरा
संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी सोमवारी युक्रेनचा शेजारी देश मोल्दोवाचा दौरा केला आहे. यादरम्यान त्यांनी राजधानी चिसीनाउमध्ये पंतप्रधान नतालिया गवरिलिता यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. युक्रेनमध्ये रशियाच्या युद्धाचा दीर्घकाळापर्यंत दिसणार असल्याचे गुतेरेस यांनी म्हटले आहे.
हंगेरीचा निर्णय
रशियाच्या कच्च्या तेलावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावरून युरोपीय महासंघातच मतभेद दिसून येत आहेत. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी ऊर्जा संकटाचा दाखला देत युरोपीय महासंघाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमवर युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सोमवारी हंगेरीमध्ये पोहोचून ओर्बन यांची भेट घेतली आहे.









