ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
श्रीलंकेची आर्थिक स्थिती सावरण्यात अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली आहे. हिंसाचार टोकाला गेला असून, सर्वसामान्यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदार, मंत्र्यांसह अन्य नेत्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. संतप्त नागरिकांची मंत्र्यांची घरेही जाळण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत खासदार सनथ निशांत (sanath nishantha) आणि जॉन्सन फर्नांडो (Johnson Fernando) यांची घरे जाळण्यात आली आहेत. आता श्रीलंकेतील हंबनटोटा येथेही आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घरालाही आग लावली आहे.
सध्या श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित चकमकी सुरू आहेत. सोमवारी निट्टंबुवा शहराबाहेर आंदोलकांनी खासदार अमरकिर्थी अथुकोर्ला यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी अथुकोरला यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यावेळी दोन जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर अथुकोरला यांना जमावाने घेरले, त्यावेळी अथुकोरला यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. श्रीलंकेत अशा प्रकारे सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत खासदारासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
हिंसाचार रोखण्यासाठी श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही आंदोलक बाहेर पडत आहेत. पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसत असून, आंदोलकांची संख्या वाढत असल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे.









