पात्रे साकारण्यासाठी धडपड : पोलिसांवरही बंदोबस्ताचा ताण : कुटुंबासह चित्ररथ पाहण्यासाठी आलेल्यांची निराशा
प्रतिनिधी /बेळगाव
‘जय जय शिवराया, श्रम जाती वाया’ या ‘तरुण भारत’च्या विशेष वृत्ताची दखल मंडळांनी घेतली आहे. आम्ही पदरमोड करून चित्ररथ सजविले आणि डीजेने हिरमोड करून आम्हाला दुखावले, अशी मंडळांची भावना आहे. कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर झालेली शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. कारण पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा मोठा ताण होता. सामाजिक अस्वस्थता, हुबळी दंगल, हिजाब, व्यापारबंदी आदी कारणांवरून कर्नाटकात वातावरण तापले होते. अशा परिस्थितीत आधीच संवेदनशील असणाऱया बेळगावात काय होणार? ही भीती प्रत्येकाला होती. पण बेळगावकरांनी आपण शांततेचे पाईक असल्याचे दाखवून दिले.
बुधवार दि. 4 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक झाली. मिरवणुकीनंतर चार दिवसांनीही त्याचे कवित्व सुरूच आहे. बेळगावचा गणेशोत्सव व शिवजयंतीला एक वेगळेच महत्त्व आहे. शिवजयंती जवळ आली की मंडळाचे कार्यकर्ते महिनाअगोदरपासून तयारीला लागतात. देखावे काय असावेत? त्यात जास्तीत जास्त जिवंतपणा कसा येईल? त्यातून कोणता सामाजिक संदेश द्यायचा? याची तयारी केली जाते. यासाठी शिवरायांच्या भक्ती आणि श्रद्धेपोटी अनेक कार्यकर्ते पदरमोड करतात.
गल्लोगल्ली देखाव्यांची तालीम घेतली जाते. शिवजयंती मिरवणुकीतील देखाव्यात भाग घेणे म्हणजे प्रति÷sचे असते. म्हणून लहान मुले, महिला आणि तरुणाई आपण एखादे पात्र साकारावे, यासाठी धडपडत असतात. एखादी संधी मिळाली तर तिचे सोने करण्याची तयारी ते ठेवतात. मिरवणुकीच्या दिवशी संपूर्ण रात्र जागवतात. मिरवणूक पाहण्यासाठी शेजारच्या महाराष्ट्र व गोव्यातूनही शिवभक्त बेळगावला येतात.
मिरवणूक बनत आहे दिशाहीन
अलीकडे ही मिरवणूक दिशाहीन बनत चालली आहे. त्यामुळे भव्यदिव्य देखावे साकारण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही शिवभक्तांना ते व्यवस्थितपणे पाहता येईनात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारच्या चित्ररथ मिरवणुकीवेळीही नेमके हेच झाले. या बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलीस दलावरही मोठा ताण असतो. यंदा तर पोलीस आयुक्त व दोन्ही उपायुक्त नवखे होते. त्यामुळे बंदोबस्ताचे काय होणार, याची धाकधुक त्यांच्या मनात होती.
बेळगाव येथे मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच हुबळीत जातीय दंगल घडली. त्याचे पडसाद बेळगावात उमटू नयेत, यासाठी पोलीस दलाने खबरदारी घेतली होती. कारण बेळगाव हे शहर अतिसंवेदनशील आहे. यापूर्वी घडलेल्या दंगलींमुळे बेळगावकरांना मोठा फटका बसला आहे. यंदा समाजमन दूषित झालेले असताना शिवजयंती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडेल का? याची शंका पोलीस अधिकाऱयांच्या मनात होती.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शेवटचे आठ दिवस संपूर्ण बंदोबस्ताची कमान आपल्या ताब्यात ठेवली. उपायुक्त रविंद्र गडादी व पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शहरातील अधिकाऱयांसमवेत अनेकवेळा मिरवणूक मार्गावर पायपीट केली. मिरवणूक बंदोबस्ताचे याआधीचे दाखले तपासले. जुन्या अधिकाऱयांकडून अनुभव ऐकून घेतले. शहरातील प्रत्येक अधिकाऱयाचा यामध्ये सहभाग होता. उद्देश एकच होता, मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी.
मिरवणुकीवर होती 5 ड्रोन कॅमेऱयांची नजर
बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा मागवण्यात आला होता. जवळपास 3 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पाच ड्रोन कॅमेऱयांची मिरवणुकीवर नजर होती. दोनशे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. उंच इमारतींवर स्कायसेंट्री तैनात करण्यात आले होते. त्यांच्या हातात लाल-हिरवे इलेक्ट्रिक बावटे देण्यात आले होते. परिस्थिती सुरळीत असेल तर इमारतीवरील पोलीस हिरवा बावटा दाखवून संदेश द्यायचा.
बंदोबस्तासाठी येणाऱया पोलिसांचे जेवणखाण व त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी लागते. यासाठी लाखो रुपये खर्च येतो. केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे तर कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ातून पोलीस व अधिकारी बेळगावला आले होते. प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता, ‘अशी मिरवणूक आम्ही पाहिली नाही. मात्र मिरवणुकीला शिस्त लागली तर सोन्याहून पिवळे झाले असते.’
शेवटी पोलीस हाही माणूसच असतो. बंदोबस्तासाठी नियुक्त झाल्यानंतर मिळेल त्या वाहनाने त्यांना बेळगावात यावे लागते. स्थानिक प्रशासन सोय करेल तिथे त्यांना आसरा घ्यावा लागतो. अनेकवेळा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचा हृदयाघाताने व अपघाती मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. सर्व संकटे पेलत बेळगावची शांतता अबाधित रहावी, यासाठी बंदोबस्तासाठी येणाऱया पोलिसांना प्रचंड ताण सहन करावा लागतो.
यापुढे कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा
प्रत्येक मिरवणुकीवेळी गल्लीतील बोळांचा वापर एखाद्या बारसारखा केला जातो. दुसऱया दिवशी रिकाम्या बाटल्या, प्लास्टीकच्या ग्लासांचा खच पडलेला दिसतो. यावेळी रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱयांना हा पसारा पाहून मनस्वी दुःख होते. यंदा तर दोन वर्षांनी मिरवणूक झाल्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध मोठय़ा संख्येने चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर पडले होते. काही कुटुंबवत्सल व्यक्ती आपल्या दोन्ही खांद्यांवर लहानग्यांना देखावा पाहण्यासाठी घेऊन हजर होते. मात्र, चित्ररथ मिरवणूक पुढे सरकतच नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली आणि त्यांचा हिरमोड झाला. यापुढे तरी परिस्थितीत बदल होण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा.
बेळगावातील अनुभव आयुष्यभराचा!
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे 1 जानेवारी 2022 रोजी बेळगावात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मटका व जुगारी अड्डेचालकांना आपल्या धडक कारवाईतून कडक संदेश दिला आहे. मटका आणि जुगारी अड्डे त्या-त्या भागातील पोलीस अधिकाऱयांना हाताशी धरूनच चालविले जातात, हे उघड सत्य आहे. पोलीस अधिकाऱयांनाही आयुक्तांनी दम भरला. ज्या-ज्या वेळी मटका-जुगारी अड्डेचालक अडचणीत येतात, त्या त्यावेळी बेळगावात जातीय दंगली घडवून सामाजिक शांततेला धक्का पोहोचविल्याची उदाहरणे आहेत. यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीवेळीही हा धोका होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी सफाईदारपणे परिस्थिती हाताळली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मंडळांचे पदाधिकारी व बेळगावकरांचे पोलीस आयुक्तांनी आभार मानले आहेत. बेळगावातील हा अनुभव आपल्यासाठी नवा होता. हा बंदोबस्ताचा अनुभव आपल्याला भावी आयुष्यात उपयोगी पडेल. तसेच यापुढील मिरवणुकांना शिस्त लावण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.