महापालिकेच्या कंत्राटदार-अधिकाऱयांकडून कार्यवाही न झाल्याने संताप : कोनवाळ गल्ली भंगीबोळातील काम अर्धवट

प्रतिनिधी /बेळगाव
कोनवाळ गल्ली परिसरातील ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने येथील भंगीबोळातील डेनेज वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू करून महिना उलटला तरी कामाची पूर्तता झाली नाही. येथे खोदण्यात आलेल्या चरीमध्ये पडून एका व्यक्तीचा पाय प्रॅक्चर झाला आहे. तरीदेखील महापालिकेच्या कंत्राटदाराकडून व अधिकाऱयांकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोनवाळ गल्ली-रामलिंगखिंड गल्लीच्या भंगीबोळातील डेनेज वाहिन्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील समस्येचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन ड्रेनेज वाहिन्या बदलण्याचे काम महिन्याभरापूर्वी हाती घेण्यात आले होते. सदर भंगीबोळातील निम्म्या भागातील डेनेजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र निम्म्या परिसरातील डेनेज वाहिन्या घालण्यासाठी केवळ खोदाई करून ठेवण्यात आली होती. भंगीबोळ अरुंद असल्याने खोदण्यात आलेल्या मातीचा ढिगारा काही नागरिकांच्या चौकटीपर्यंत साचला होता. या ढिगाऱयावरून ये-जा करणे नागरिकांना मुश्कील बनले होते. काही नागरिकांना तर घराबाहेर पडण्यासदेखील रस्ता नव्हता. वृद्ध आणि लहान मुलांना ढिगाऱयावरून चरीमध्ये उतरून बाहेर जावे लागत होते. चौकटीसमोरील मातीचा ढिगारा हटविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. पण कंत्राटदाराने याची दखल घेतली नाही. परिणामी या ढिगाऱयावरून जाताना येथील रहिवासी असलेले अण्णाप्पा गुज्जर पाय घसरून चरीमध्ये पडले. त्यामुळे त्यांच्या पायाला आणि कंबरेला जबर दुखापत झाली. त्यामध्ये त्यांच्या पायाला पॅक्चर झाले आहे. दि. 16 मार्च रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती अधिकाऱयांना दिल्यानंतर येथील चरी बुजविण्यात आल्या, पण रस्ता करण्याचे काम अद्यापही अर्धवट आहे. तसेच काही डेनेजवाहिन्या घालण्याचे काम प्रलंबित आहे. दीड महिना उलटला तरी डेनेजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण केले नाही. तसेच चरीमध्ये पडून जखमी झालेल्या अण्णाप्पा गुज्जर यांची विचारपूसदेखील केली नाही. व्यवसायाने टेलर असलेल्या गुज्जर यांच्या पायालाच दुखापत झाल्याने कामधंदा बंद ठेवून घरात बसावे लागले आहे. तसेच औषधोपचारासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे औषधोपचारासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम महापालिकेने त्वरित द्यावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेने व कंत्राटदाराने अर्धवट काम पूर्ण न केल्यास तसेच जखमी व्यक्तीला नुकसानभरपाई न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनपा अधिकारी आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.









