ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात भोंग्यांच्या विषयावरून राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात यावरून वाद सुरु आहे. तर उत्तर प्रदेशात (uttar pradesh) योगी सरकारने भोंगे उतरवण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळावरून एक लाखापेक्षा अधिक भोंगे खाली उतरविले आहेत. तर काढलेले भोंगे पुन्हा लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा इशारा योगींनी दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, युपीमध्ये धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर कुठलेही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, अशी माहिती सरकारी प्रवक्त्यांनी देण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यांवर कोणत्याही धार्मिक पद्धतीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नका, अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हवेत, रस्त्यांवर नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्रात मनसेच्या गुढी पाडवा सभेत राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत ते उतरवले गेले पाहिजेत अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र देशभरात उमटले आहेत.