वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथील डी.वाय.पाटील स्टेडियमवर सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील औपचारिक सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे पण कोलकाता संघ आपली बुडती नाव सावरण्याचा प्रयत्न करेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इsंडियन्स संघाचे या स्पर्धेत प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याचे स्वप्न यापूर्वी उधळले आहे. मुंबई संघाने या स्पर्धेतील आपल्या दहा सामन्यांत केवळ दोन विजयांसह 4 गुण नोंदवित शेवटचे स्थान मिळविले आहे. मुंबई संघाने आता या स्पर्धेतील आपले उर्वरित चार सामने जिंकले तर त्यांचे 12 गुण होतील पण हे गुण बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत. रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघाने 12 गुण मिळविले असून तसेच या स्पर्धेतील अन्य तीन संघांनी 16 आणि 14 गुण नोंदविले आहेत.
श्रेयस अय्यरचे नवे नेतृत्व कोलकाता नाईट रायडर्सला यावेळी लाभले. कोलकाता संघाने यापूर्वी दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता संघाचा मोठय़ा फरकाने पराभव केल्याने हा संघ 11 सामन्यांतून 8 गुणांची कमाई केली आहे. कोलकाता संघाचे आता तीन सामने बाकी आहेत. हे उर्वरित सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण 14 होतील पण त्यांना स्पर्धेच्या पदक तक्त्यात चौथे स्थान मिळेल याची खात्री नाही. आयपीएल स्पर्धेला आता शेवटचा टप्पा बाकी राहिला आहे. आता आगामी आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांना विचार करावा लागेल. 2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत या दोन्ही संघांची साफ निराशाजनक कामगिरी झाली आहे. कोलकाता आणि मुंबई या दोन संघांमध्ये आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 30 सामने झाले असून मुंबईने 22 तर कोलकाताने 8 सामने जिंकले आहेत. मुंबई संघातील इशान किसन आणि कर्णधार रोहित शर्मा यांना सोमवारच्या सामन्यात अधिक धावा जमविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आयपीएल स्पर्धेत 5000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी रोहित शर्माला आणखी 88 धावांची जरूरी आहे. सोमवारच्या सामन्यात रोहित, इशान किसन आणि सुर्यकुमार यादव यांना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात पॉवर प्लेचा फायदा उठविता आलेले नाही.
दोन्ही संभाव्य संघातील खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्स- फिंच, तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितेश राणा, प्रथम सिंग, रिंकु सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, साऊदी, उमेश यादव, वरूण चक्रवर्ती, अमन खान, रस्सेल, रॉय, करूणारत्ने, मोहम्मद नबी, रमेशकुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, बिलींग्ज आणि जॅक्सन.
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रित सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, थंपी, शोकेन, बुमराह, उनादकट, आर्चर, मार्कंडेय, एम. अश्विन, मेर्डीथ, मिल्स, कार्तिकेय सिंग, सॅम्स, ब्रेव्हिस, ऍलन, पोलार्ड, संजय यादव, ज्युवेल आणि इशान किसन.









