चीनमधील अत्यंत अनोखा पारंपरिक खेळ
जगातील प्रत्येक देशाचे वेगवेगळे पारंपरिक क्रीडाप्रकार असून ते कालौघात हरवत चालले आहेत. फुटबॉल आणि क्रिकेटच्या युगात पारंपरिक खेळ खेळण्याची इच्छा कमी होत चालली आहे. भारतात विटीदांडूसारखे खेळ शहरी मुलांना माहितच नाहीत. चीनमधील पारंपरिक क्रीडाप्रकार पाहताना बॅडमिंटनसारखा वाटतो, परंतु यात केवळ रॅकेटचा वापर होत नाही.
ग्रीनबेल्ट आणि रोड इन्स्टीटय़ूटचे अध्यक्ष एरिक सोलहेम यांनी ट्विटरवर या खेळाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला असून यात दोन जण हा खेळ खेळताना दिसून येतात. या खेळाला शटलकॉक किकिंग म्हटले जाते.

टी जियान जी या नावाने प्रसिद्ध या खेळात रॅकेटच्या जागी पायांनी शटलकॉक मारले जाते. हा खेळ चीनमध्ये हान वंशाच्या कालखंडापासून खेळला जात आहे. हान वंश ख्रिस्तपूर्व 206 साली चीनवर राज्य करत होता. मिंड वंशाच्या (1368-1644) कालखंडात या खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि क्विंग वंशापर्यंत या खेळाची लोकप्रियता मोठी होती. परंतु त्यानंतर लोकांनी किक मारण्याची पद्धत बदलली आणि खेळात नवनव्या ट्रिक्स वापरल्या जाऊ लागल्या.
क्रीडाप्रकार पुनर्जीवित
या खेळात एकावेळी एकाच पायाने शटलकॉक मारण्याचा नियम आहे. शटलकॉक न पाडवता हवेत ठेवायचे असते. शटलकॉक पायाच्या टाचांनी मारले जाते. 1930 पर्यंत हा क्रीडाप्रकार हरवत चालला होता, परंतु नव्या चीनच्या उभारणीदरम्यान या क्रीडाप्रकाराला चालना देण्यात आली. देशातील पहिली अधिकृत शटलकॉक किकिंग स्पर्धा गुआंग्जो शहरात 1956 मध्ये आयोजित करण्यात आली. आता या क्रीडाप्रकार चीनमध्ये अनेक ठिकाणी पोहोचला आहे.









