मच्छे येथील घटना, मालकाविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे येथील एका फौंड्रीमधील ग्रॅन्डर मशीनची दुरुस्ती करताना चाक डोक्मयाला आदळून एक कामगार जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
लगमाण्णा दुर्गाप्पा नाईक (वय 46), मूळचा रा. गुटगुद्दी, ता. हुक्केरी, सध्या रा. संभाजी गल्ली, मच्छे असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शनिवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ग्रॅन्डर मशीनची दुरुस्ती करताना ही घटना घडली आहे. ग्रॅन्डर मशीनचे चाक निकळून लगमाण्णाच्या डोक्मयावर आदळले. त्याच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एस. फौंड्री या कारखान्याच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









