पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होऊन शालेय वातावरणाशी जुळवून घेता यावे याकरिता सरकारी प्राथमिक शाळांमधील पहिली ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना ‘विद्या प्रवेश’ नावाचा कार्यक्रम (उपक्रम) राबविला जाणार आहे. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकूण 12 आठवडे विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये गीत, नृत्य, संगीत, गोष्टी, संभाषण आदींचा समावेश असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि इतर धडे मिळणार आहेत. 16 मे पासून शाळांना प्रारंभ होणार आहे. शाळांना सुरुवात होताच विद्या प्रवेश हा उपक्रम राबविला जाणार आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्याबरोबरच अंगणवाडय़ा देखील बऱयाचकाळ बंद राहिल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थी शालेय शिक्षणापासून काहीकाळ दूर राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांत पुन्हा शिक्षणाची आवड निर्माण करून शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे अंगणवाडय़ा मागील दोन वर्षे बंद होत्या. त्यामुळे यंदा पहिलीत प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, भावनिक नातेसंबंध, मुला-मुलींमध्ये संवाद, शिक्षकांशी मुक्तपणे संवाद आदी कौशल्ये विकसित व्हावी याकरिता हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.









