जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन, विनाअनुदानित शिक्षकांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
जिह्याबरोबरच संपूर्ण राज्यात 1995 पासून सुरू झालेल्या शाळांना अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी धरणे आंदोलन छेडले आहे. याचबरोबर आमरण उपोषणही सुरू केले आहे. तिसऱया दिवशीही शिक्षकांचे आंदोलन सुरूच होते. तातडीने आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
विनाअनुदानित शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहे. काही शिक्षक निवृत्त होत आहेत. तरी देखील त्यांना अजून वेतन दिले गेले नाही. यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही शिक्षक 30 वर्षे झाली नोकरी करत आहेत. मात्र त्यांना वेतन देण्यात आले नाही. शाळेला अनुदान दिले नसल्यामुळे शिक्षकांना वेतन मिळणे कठीण झाले आहे. तेंव्हा तातडीने या सर्व शाळांना अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षकांचे हे आंदोलन शनिवारीही सुरूच होते. महिला शिक्षकांसह इतरांनी भाग घेऊन सरकारचा निषेध नोंदविला आहे. आम्ही निवृत्त होत असलो तरी आम्हाला वेतन मिळत नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे. याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









